बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील प्रकार, खड्डा बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून बेळगाव-वेंगुला मार्गावर जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी खोदलेल्या खडय़ाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर महात्मा गांधी चौकाजवळ जलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र काम झाल्यानंतर खड्डा बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव-वेंगुला मार्गावर मधोमध ही खोदाई केल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
दरम्यान या चौकात चारी बाजूने येणाऱया वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय याठिकाणी विनाकारण फिरणाऱयांची चौकशी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने बॅरीकेड्स उभे केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी खोदलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.