प्रतिनिधी / नागठाणे :
ग्वाल्हेर-बेंगळूर महामार्गावर काशीळ(ता.सातारा) गावच्या हद्दीत अज्ञात कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात युवक ठार झाला. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. गौरव बाळासो लोहार (वय.२८,रा,काशीळ,ता.सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशीळ येथून गौरव लोहार हा त्याच्या दुचाकीवरून रात्री उशिरा निसराळेफाटा येथे आला होता. यावेळी दुचाकीवर मित्र सुमित विजय सुतार (वय.31,रा,वडणगे,कोल्हापूर.हल्ली रा.काशीळ) हाही होता. निसराळेफाटा येथून हे दोघे पुन्हा काशीळकडे निघाले. रात्री 11.45 च्या सुमारास त्यांची दुचाकी काशीळ गावच्या हद्दीत आली असता पुढे चाललेल्या कंटेनरला दुचाकीची जोरात धडक बसली.या अपघातात गौरव लोहार हा गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी सातारा येथे नेण्यात येत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला सुमित सुतार हा किरकोळ जखमी झाला. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.