गाजियाबाद / वृत्तसंस्था :
उत्तरप्रदेशच्या बरेली येथून निघालेले एका चार्टर्ड विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. या घटनेनंतर मदतकार्यासाठी हिंडन वायुतळावरून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. पण विमान पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याने हेलिकॉप्टरला शेतात उतरावे लागले आहे. वायुदलाच्या मदतीने चार्टर्ड विमानातील दोन्ही वैमानिकांना वाचविण्यात आले आहे.
शेतजमिनीत हेलिकॉप्टर उतरविणे धोकादायक ठरू शकले असते, पण गर्दी पाहून तसेच आपत्कालीन स्थितीत हा निर्णय घ्यावा लागला आहे. आपत्कालीन स्थिती असूनही लोकांना स्वतःच्या जबाबदारींची जाणीव झालेली नाही. सेल्फी घेण्याच्या चढाओढीमुळे मदतकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.
महामार्गावर चार्टर्ड विमान पाहून लोकांनी सेल्फी घेण्यासा प्रारंभ केल्याने तेथे गर्दी निर्माण झाली. या गर्दीमुळे वायुदलाच्या हेलिकॉप्टरला लँडिंगसाठी कुठलीच योग्य जागा उपलब्ध झाली नाही. शेतात उतरलेल्या हेलिकॉप्टरसोबतही लोकांनी सेल्फी घेतली आहे.
या सर्व प्रकारामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प पडली होती. जमावाला हटविण्यासाठी अखेरीस पोलिसांना पाचारण करावे लागले आहे. सदरपूर गावानजीक महामार्गावर ही घटना घडली आहे. विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप असल्याचे माहिती गाजियाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी दिली आहे.