प्रतिनिधी / वास्को :
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी आमदार एलिना साल्ढना यांच्याशी उध्दटपणे वागून त्यांना पोर्तुगीज संबोधल्याच्या प्रकरणाचा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, कासावलीच्या सरपंच मार्था साल्ढाना, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, मच्छीमार संघटना व आम आदमी पार्टीचे नेते ओलॅन्सीयो सिमोईस यांनी निषेध केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकाराची दखल घ्यावी व कृती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग मागच्या रविवारी वास्को रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी वास्कोत आले होते. यावेळी त्यांची कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना, कासावलीच्या सरपंच मार्था साल्ढाना व कासावली, वेलसाव आरोसी भागातील रेल्वे विस्ताराला विरोध करणाऱया काही लोकांनी भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी रेल्वेच्या सदर अधिकाऱयांनी आमदार एलिना साल्ढाना यांना पोर्तुगीज संबोधून त्यांचा अपमान केला होता. या प्रकाराच्या निषेधार्थ गुरूवारी वास्कोत आमदार कार्लुस आल्मेदा, सरपंच मार्था साल्ढाना, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत व इतरांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, कासावली, सांकवाळ व वेलसाव पंचायतीचे पंच सदस्य, मच्छीमार नेते व आम आदमी पार्टीचे नेते ओलॅन्सियो सिमोईस व इतर नागरिक उपस्थित होते.
आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रेल्वेच्या अधिकाऱयांनी आमदार एलिना साल्ढाना यांचा अपमान केल्याबद्दल खेद व्यक्त केला. तसेच या प्रकाराच्या निषेधार्थ आपले राजकीय मतभेद विसरून एकाच उद्देशाने सर्वजण एकत्र आल्याबद्दल समाधानही व्यक्त केले. हा निषेध अराजकीय स्वरूपाचा आहे. आमदार एलिना साल्ढानाबाबत घडलेल्या प्रकाराचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाब विचारायला हवा. त्यांच्याविरूध्द कृती करायला हवी. अन्यथा लोक त्या अधिकाऱयांना उत्तर देण्यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब करू शकतात. रेलमार्ग विस्ताराबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. स्व. मनोहर पर्रीकर हयात असताना एका बैठकीत आपण रेल्वे अधिकाऱयांना रेलमार्गाच्या विस्ताराबाबत प्रश्न केले होते. विस्तार कुणाच्या फायदय़ासाठी करण्यात येतोय असा खुलासा आपण मागितला होता. मात्र, आपल्याला उत्तर मिळाले नव्हते असे ते म्हणाले.
मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी एलिना साल्ढाना या सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणाऱया व आदरणीय लोकप्रतिनिधी असून त्यांच्याशी गैरभाषेत बोलणे हा प्रकार खेदजनक आहे. त्यांचा अपमान हा जनतेचा अपमान असल्याचे ते म्हणाले. सरपंच मार्था साल्ढाना यांनी अजयकुमार सिंग यांनी आमदारासोबत कसे वर्तन केले याची माहिती दिली. रेलमार्गाच्या विस्तारामुळे कोणते परीणाम होतील. त्यावर रेल्वेकडे कोणती उपाययोजना आहे असे प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांची भेट घेण्यात आली होती. लोकांच्या समस्या मांडणे त्यांचा अधिकार होता. मात्र, त्या अधिकाऱयांनी आमदारांना मान दिला नाही. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली व आमदारांना पोर्तुगीज संबोधून त्यांचा अपमानही केला असे मार्था साल्ढाना म्हणाल्या. भाजपा सरकारने या प्रकाराची दखल घ्यायला हवी. त्या अधिकाऱयाने माफी मागायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
ओलान्सियो सिमोईस यांनीही त्या अपमानाचा निषेध केला. रेलमार्ग विस्तारामुळे कासावली, वेलसाव्। आरोसी भागातील नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. एकेकाळी प्रवासी वाहतुकीसाठी त्या भागात लोकांनी आपल्या जमीनी दिल्या होत्या. आता मालवाहतुक वाढलेली असून रेल मार्गाचा विस्तार झाल्यास अनेकपटीने या मार्गावर ताण वाढून पर्यावरण व पर्यटनावरही परीणाम होणार असल्याचा दावा केला. नगरसेवक दीपक नाईक, पंच नारायण नाईक, पंच नंदीता दयाल यांनीही घडलेल्या प्रकाराचा निषेध केला.