ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 2033 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांपार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 35 हजार 058 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी राज्यात 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 23, नवी मुंबई 8, पुण्यात 8, औरंगाबाद 2, जळगाव 2, नगर 2, नागपूर 2, भिवंडी आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. काल दिवसभरात 749 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 8437 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 25 हजार 392 रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 लाख 82 हजार 194 नमुन्यांपैकी 2 लाख 41 हजार 103 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 35 हजार 058 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 66 हजार 242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 18 हजार 678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.