मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषिक अल्पसंख्याक म्हणून मिळणारे अधिकार देण्यात यावेत, या मागणीसाठी सोमवार दि. 25 रोजी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वा. धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा काढला जाणार असून, यामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य सर्वाधिक असताना मराठीतून कागदपत्रे देण्यास चालढकल केली जात आहे. वारंवार मागणी करून देखील अद्याप मराठी भाषेतून कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीनुसार कागदपत्रे उपलब्ध करून देणे अनिवार्य असतानाही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. याचबरोबर शहरात लावण्यात येणाऱया दिशादर्शक फलकांवरून मराठीला डावलले जात आहे. त्यामुळे भाषिक अधिकारांविना मराठी भाषिक भरडला जात आहे.
मराठी भाषेतून परिपत्रके द्यावीत, दिशादर्शक फलकांवर मराठीचा समावेश करावा व मनपासमोरील अनधिकृत ध्वज हटवावा अशा विविध मागण्यांसाठी सोमवार दि. 25 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून कॉलेजरोड मार्गे, चन्नम्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वा. सर्व मराठी भाषिकांनी धर्मवीर संभाजी चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, म. ए. समिती महिला आघाडी, म. ए. युवा समिती, शिवसेना सीमाभाग यासह मराठी भाषिक संघटनांनी केले आहे.
अनधिकृत ध्वजाबाबत अद्याप ठोस निर्णय नाही
मनपासमोर अनधिकृत लालपिवळा ध्वज लावण्यात आला आहे. कोणतीही कायदेशीर मान्यता नसताना हा ध्वज लावण्यात आला आहे. केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी असे प्रकार सुरू असून, तो ध्वज हटविण्यासाठी आंदोलने करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने यासाठी वेळ देखील मागवून घेतली. परंतु अद्याप ध्वज हटविण्यात न आल्याने म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला जाणार आहे.