ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आता एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांपर्यंत तर 2 आणि 3 पदरी मास्क तीन आणि चार रुपयांना मिळणार आहे. याबाबत निर्णय जाहीर केला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. केंद्र शासनाचे किमतीवरील नियंत्रणही 30 जून 2020 नंतर संपुष्टात आले होते. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर यांच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचे निदर्शनात आले होते. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने एका समितीची स्थापना केली होती. त्यामुळे आता राज्यात मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.
या समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमती निश्चित केल्या आहेत. यावरून उत्पादकाची उत्पाद किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचाही नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मूल्य प्रस्तावित केल्याचे अहवालात नमूद केले आहे.