नव्वद प्रशिक्षणार्थी पंचांचा सहभाग
सांगरुळ /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्यावतीने तीन दिवसीय ” कुस्ती पंच प्रशिक्षण शिबिर” उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात ९० प्रशिक्षणार्थी पंचानी सहभाग घेतला.
कराड (जि.सातारा ) येथे हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांच्या स्व.खाशाबा दाजी शिंदे व स्व.महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील कुस्ती संकुलात प्रशिक्षण वर्गास महाराष्ट्रभरातून ८० पुरुष पंच व १० असे ९० प्रशिक्षणार्थी पंच उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणाऱ्या कुस्ती स्पर्धेची माहिती, आधुनिक मॅटची माहिती यासह फ्रीस्टाईल कुस्ती, ग्रीकोरोमन कुस्ती व महिला कुस्तीच्या नियमाविषयी सखोल माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले.
पंच हा कोणत्याही खेळातील आत्मा असतो. खेळाडू जीवाचे रान करुन त्यामध्ये करियर घडवत असताना त्यांच्या खेळात न्यायदान करणारे पंच म्हणजे साक्षात ईश्वराचे रुप असते. सध्याच्या झटपट कुस्तीच्या युगात कुस्तीही नेमाने बांधील झालेली आहे. कुस्तीमध्ये न्यायदान करणारे पंच अभ्यासू व कुस्तीतील नियमाबाबत जाणकार असतील तर कोणत्याही मल्लावर अन्याय होत नाही. म्हणून कुस्ती मल्लविद्या महासंघाने महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त केलेल्या तांत्रिक समिती सदस्यांना याठिकाणी एकत्रित करून त्यांना कुस्तीचे गुणदान, आंतरराष्ट्रीय नियमानुसार शिकवण्यात आले. यामुळे कुस्ती-मल्लविद्या महासंघाची पंच कमिटी कुस्तीतील आधुनिक नेमाने प्रशिक्षित व दर्जेदार होण्यास मदत होणार आहे .
भारताचे उपपंतप्रधान,अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय गुरू स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून पै.धनाजी पाटील आटकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंच प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला.यावेळी धनाजी पाटील यांनी कुस्ती स्पर्धेत पंचाचे महत्व विशद केले.
पै.संतोष घाडगे,पै.प्रेमचंद अकोले, पै.अमर कणसे, पै.प्रवीण शिंदे,पै.राहुल , कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पै.संदीप बापू रासकर यांनी सदिच्छा भेट दिली. पै.गणेश मानुगडे आदि उपस्थित होते. यावेळी प्रत्यक्ष कुस्त्या झाल्या व उपस्थित प्रशिक्षणार्थी पंचांची न्यायदान करण्याचा सराव केला.
यानंतर प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ झाला.संकुलाचे संथापक हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मार्गदर्शक पै.धनाजी पाटील आटकेकर,डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळू पडघम,कुस्ती मल्लविद्या महासंघ उपाध्यक्ष राहुल जाधव कुस्ती मल्लविद्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पै.महेश भोसले,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पै.सागर साळुंखे, कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या अध्यक्ष आनंदराव पाटील, सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या अध्यक्ष अमरसिंह साबळे,तांत्रिक समिती राज्य अध्यक्ष संतोष घाडगे ,कराड तालुका कुस्ती मल्लविद्या अध्यक्ष पै.संग्रामसिंह माने,वाळवा तालुकाध्यक्ष पै.संग्रामसिंह जाधव, सांगली जिल्हाअध्यक्ष पै.प्रवीण शिंदे ,जेष्ठ कुस्ती मार्गदर्शक पै.कमलाकर चौगुले ,कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संदीप बापू रासकर,श्रीशिवप्रतिष्ठान कराड चे पै.धनंजय गुरव,पै.धैर्यशील देसाई,महिला कुस्ती मल्लविद्या कोल्हापूर अध्यक्षा अनिता पाटील,निवड समिती अध्यक्षा पै.रिमादेवी शेळके यासह इतर मान्यवरांच्या हस्ते परितोषक वितरण व समारोपाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
कोणत्याही फी शिवाय तीन दिवस आधुनिक कुस्तीचे मोफत प्रशिक्षण यासह टी शर्ट,ओळखपत्र, कलर बँड, शिट्टी आदी पंचाचे साहित्य मोफत वितरित करण्यात आले.याबद्दल प्रशिक्षणार्थी पंचानी संयोजकांचे आभार मानले .प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक पंचांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले