कलाकार नाट्य रसिकांचा हिरमोड, 15 जानेवारीपासून बालगंधर्व नाट्यगृहात होणार होती स्पर्धा
प्रतिनिधी / मिरज
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणारी 60 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा कोरोना आणि ओमायक्रोनचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे कलाकार आणि नाट्य रसिकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत कला संचालनालयाने अधिकृत पत्र दिले नसल्याचे स्पर्धा समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे. भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने मंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठवून कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा लांबणीवरवर नेऊ नयेत अशी विनंती करण्यात आले आहे.
60 वी मराठी हौशी नाट्य स्पर्धा यंदा 15 जानेवारीपासून शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार होत्या. नाट्यगृह आरक्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महापालिकेच्या बांधकाम विभागाला पत्रही पाठवले होते. तसेच नाट्यगृहात कलाकारांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी महापौर आणि महापालिकेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी संयुक्त बैठक घेऊन बालगंधर्व नाट्यगृहात सर्व तांत्रिक बाबी सोडण्याची तयारी केली होती. नाट्यस्पर्धा आयोजनाची लगबग सुरू असताना सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी सदरच्या स्पर्धा मे किंवा जून 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कलाकार, रंगकर्मी, नाटक प्रेमी रसिकांचा हिरमोड झाला आहे.