ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महावितरण मधील 7 हजार जागा आठ दिवसात भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे प्रलंबित निवडणूक प्रक्रियेतील उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, महावितरणने जुलै 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून 2 हजार उपकेंद्र सहायक आणि 5 हजार विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून 8 दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत. डॉ. राऊत यांच्या आदेशामुळे या निर्णयामुळे या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून महावितरणमधील प्रलंबित भरती प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकसेवेसाठी तब्बल 7 हजार कर्मचाऱ्यांची आणखी भर पडणार आहे.