प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरामध्ये आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या जाणाऱया महास्वच्छता अभियानात फुटबॉल टीम उतरली. शहरात फुटबॉल हंगाम तापला असताना रविवारी मंगळवार पेठ फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत शहर स्वच्छतेचे धडे दिले. मोहिमेत 9 टन कचरा संकलित करण्यात आला.
शाहू उद्यान येथे स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते व नगारिक यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी फौंडेशनचे प्रमोद माजगावकर यांच्या वाढदिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. आता पंचतारांकीत बहुमान मिळविण्यासाठी स्वच्छता मोहिमेत शहर वासियांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न शहरवासियांनी करावा. तसेच प्लास्टिकचा वापर स्वतः टाळून इतरांनाही प्लास्टीकचा वापर करु देऊ नका, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले.
मोहिमेत हॉकी स्टेडियम, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, माळकर तिकटी ते शिवाजी मार्केट, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, सायबर चौक ते शेंडा पार्क, उड्डान पूल ते कावळा नाका, कावळा नाका ते तावडे हॉटेल, संभाजी नगर ते कळंबा जेल, कोटीतीर्थ तलाव, गांधी मैदान, शुक्रवार पेठ गायकवाड वाडा, पद्माराजे शाळा, रिलायन्य मॉल संपूर्ण परिसर, माळकर तिकटी, माळकर तिकटी आदी परिसरासह हॉकी स्टेडियम येथील चॅनेलचीही स्वच्छता करण्यात आली. मोहिम 5 जेसीबी, 6 डंपर, 11 आरसी गाडया, 1 टिपर व महापालिकेचे 180 स्वच्छता कर्मचारी यांच्या सहायाने राबविण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणबाबत महालक्ष्मी मंदीर, एन.सी.सी. ऑफिस परिसर, गजाननमहाराज नगर आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली.
मोहिमेत राष्ट्रवादीचे गटनेते सुनिल पाटील, नगरसेवक शेखर कुसाळे, किरण नकाते, आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, व्हि.एम.पाटील, एच.जी.कांबळे, शाखा अभियंता आर.के.पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, शशिकांत भालकर, सचिन मोहिते, स्वरा फौंडेशनचे अदिल्य लातूरकर, व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रेम सातपुते व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.