सेन्सेक्स निर्देशांकात 84 अंकांची घट, ऑटो समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक कमकुवत बाजारांमुळे व स्थानिक स्तरावर विक्रीवर दिसलेला भर यामुळे शेअर बाजारात नव्या महिन्यातील पहिल्या दिवशी काहीशी घसरण अनुभवायला मिळाली. ऑटो आणि आयटी क्षेत्रातील समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.
सोमवारी नव्या महिन्यातील पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 56,975.99 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 33 अंकांच्या घसरणीसोबत 17,069.10 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्स निर्देशांकात इंडसइंड बँक, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत होते.
सोमवारी सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 631 अंकांच्या घसरणीसोबत अर्थात 1.11 टक्के घटीसह 56,429 अंकांवर खुला झाला होता तर निफ्टी 176 अंकांच्या नुकसानीसह 16,925 अंकांवर खुला झाला होता. ऑटो आणि आयटी क्षेत्रातील समभागांचे मोठे नुकसान झाले. अजंठा फार्मा, सुप्रीम इंडस्ट्रि, सुप्रीम इंडिया, बजाज होल्डींग्ज आणि टाटा पॉवर यांचे समभाग तेजी राखून होते. एबी कॅपिटल, अपोलो हॉस्पिटल, अशोक लेलँड व जेएसडब्ल्यू एनर्जी यांचे समभाग नुकसानीत होते. टायटन, विप्रो, एशियन पेंटस् आणि मारुती सुझुकी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. बँक, वित्त, धातू आणि फार्मा निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग कमकुवत होत बंद झाले.
निफ्टीतील 11 निर्देशांकात 4 मध्ये घसरण राहिली होती तर 4 निर्देशांकात तेजी होती. दुसरीकडे पादत्राणांच्या क्षेत्रातील कंपनी कॅम्पस ऍक्टीव्हवेअर यांच्या इशुला जवळपास 52 पट गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळाला आहे, अशात समभाग आता प्रीमीयमसह बाजारात लिस्ट होतील, असे तज्ञ आपला अंदाज बांधत आहेत. 9 मे रोजी कंपनीचा समभाग बाजारात लिस्ट होणार आहे.