वृत्तसंस्था / मुंबई :
फिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा पुढील वषी भारतात भरविली जाणार आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या स्पर्धा पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनाने स्थानिक आयोजन समिती आणि महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर गुरुवारी सविस्तर चर्चा केली.
फिफाच्या या महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला मिळत आहे. सदर स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 7 मार्च 2021 रोजी खेळविला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाबरोबर स्थानिक आयोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्याच्या क्रीडा खात्याचे वरि÷ अधिकारी, पश्चिम भारत फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी आणि डी. वाय. पाटील स्टेडियमचे अधिकारी यांचा समावेश होता. गेल्या वर्षापासूनच या स्पर्धेच्या पूर्वतयारीला प्रारंभ करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावरील या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळत आहे, असे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा विभागाकडून संपूर्ण सहकार्य स्थानिक स्पर्धा आयोजकांना मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या स्पर्धेसाठी कोणत्या वस्तूंची गरज भासणार आहे, याची माहिती शासनाला या बैठकीद्वारे मिळाली. सदर स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण न येता यशस्वी केली जाईल, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या देशामध्ये कोरोना महामारी परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहर केला आहे. पण या परिस्थितीमध्ये येत्या काही महिन्यात निश्चित बदल होईल, अशी आशा महाराष्ट्र शासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. फिफाच्या या स्पर्धेचे यजमानपद भारताला तसेच अंतिम सामन्याचे यजमानपद महाराष्ट्राला मिळत असल्याबद्दल राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान वाटतो. यापूर्वी भारतामध्ये फिफाची युवा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यात आली होती. 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेला गुवाहाटीमध्ये 17 फेब्रुवारीला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमुळे भारतात फुटबॉल या क्रीडा प्रकारामध्ये महिला फुटबॉलपटू अधिक प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.