अरविंद केजरीवाल यांच्या गोव्यासाठी घोषणा
प्रतिनिधी /मडगाव
सरकारने भ्रष्टाचार रोखल्यास राज्यातील जनतेसाठी अनेक योजना मार्गी लावणे शक्य असते. गोव्यात आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर गृहआधार योजनेच्या रक्कमेत 1,500 रूपयांवरून 2,500 रूपये वाढ केली जाईल, अशी हमी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी काल रविवारी मडगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना दिली.
अरविंद केजरीवाल यांनी या पूर्वी गोवेकरांना तिनशे युनिट मोफत वीज, मोफत पाणी, मोफत तीर्थ यात्रा अशा योजनांची हमी दिली आहेत. त्यात रविवारी गृहआधारच्या रक्कमेत वाढ करण्याबरोबरच ज्या युवतींनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या खात्यावर दर महिना 1000 रूपये जमा करण्याची हमी दिली. येथील दैवज्ञ भवनात आयोजित केलेल्या या महिला मेळाव्यात महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.
दिल्लीत आपकडून अनेक योजना मार्गी
दिल्लीत आम आदमी सरकारने जनतेच्या हिताचा विचार करूनच अनेक योजना मार्गी लावल्या. आत्ता गोव्यातील जनतेला या योजनांचा फायदा मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आम आदमी पक्षाचे महिला सबलीकरण हे मोठे पाऊल ठरणार असून जगातील कोणत्याही सरकारने अशी योजना लागू केलेली नाही. गोव्यातील साडेपाच लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळेल, असे त्यांनी सांगितले. आम्ही केवळ जनेतला आश्वासने देत नाही तर दिलेली आश्वासने पूर्ण करतो असे केजरीवाल म्हणाले.
गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना आपल्या पतीवर किंवा मुलींना आपल्या पालकांवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून रहावे लागणार नाही. ज्या कुटुंबाना आपली आर्थिक बाजू भक्कम आहे असे वाटत असेल त्या कुटुंबाना या योजनेचा लाभ न घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल ते म्हणाले.
या मेळाव्याच्या व्यासपीठावर आपचे राज्य निमंत्रक राहूल म्हांबरे, उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सिसिलीया रॉड्रिग्स, राजदीप नाईक, ऍड. अमित पालेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अमित पालेकर यांचे विशेष कौतुक
ओल्ड गोवा येथे सलग पाच दिवस उपोषण केलेल्या ऍड. अमित पालेकर यांचे या मेळाव्यात विशेष कौतुक करण्यात आले. अमित पालेकर हे मेळाव्याला आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. सभागृहात त्यांचे आगमन होताना सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. केजरीवाल यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पाच दिवस केलेले उपोषण हे गोव्याच्या हितासाठी होते. ते आपल्या निर्धारापासून हटले नाही असे ते म्हणाले. पालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण सामान्य कुटुंबात जन्माला आलो असून सामान्य जनतेसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
सरकार तुमच्या दारीवर 12.43 कोटी रूपये खर्च
भाजप सरकारने ‘सरकार तुमच्या दारी’ या इव्हेंटवर 12.43 कोटी रूपये खर्च केल्याचा दावा आपचे राज्य निमंत्रक राहूल म्हांबरे यांनी केला. ही रक्कम गृहआधार देण्यासाठी वापरली असती तर राज्यातील महिलांना दिलासा मिळाला असता. गोव्यात 2017 पासून दर आठवडय़ात महिलांविरूद्ध किमान चार गुन्हे घडतात. हे प्रकार बंद होण्याठी महिलांना गोव्यात परिवर्तन घडवून आणावे व आम आदमी पक्षाला संधी द्यावी असे म्हांबरे म्हणाले.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिमा कुतिन्हो याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, गोव्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बलात्काराच्या घटनांत दुप्पटीने वाढ झालेली आहे. बहुतांश पीडिता अल्पवयीन आहेत. भाजप सरकारातील एका मंत्र्यांचे वासनाकांड उघडकीस आले असून या मंत्र्यांने आपल्या पदाचा गैरवापर करून एका महिलेचे लैंगिक शौषण केलेले आहे. ही गंभीर बाब असताना भाजप सरकार या मंत्र्याची पाठराखण करण्यासाठी धडपडत आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी बसमध्ये मोफत प्रवास तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याचे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.