प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग व पर्स तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृह व ज्ञानज्योती कौशल्य विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुतालिक देसाई, विजया हिरेमठ, सुवर्णा पाटील, विजया नेसरगी, प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते. साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के. यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
क्षणभरातील रागामुळे चूक झालेली असते. भूतकाळाचा विचार न करता भविष्याचा प्रत्येकाने विचार करावा. अशा पद्धतीचे प्रशिक्षण भावी आयुष्यासाठी उपयोगी पडते. महिला कैद्यांनी त्याचा सदुपयोग करून घेतला तरच त्यांना स्वावलंबी जीवन जगता येणार आहे, असे मुतालिक देसाई यांनी सांगितले. यावेळी जेलर अभिषेक, बसवराज बजंत्री, साहाय्यक जेलर अनुसया पाटील, प्रियांका हिरेकर, पूजा केळवेकर आदी उपस्थित होते.