माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था
भारतीय महिला संघ आज (रविवार दि. 6) आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या सलामी लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करत आहे. 2005 व 2017 मध्ये उपजेतेपदापर्यंत मजल मारु शकलेला भारतीय संघ यंदा हुलकावणी देणाऱया जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी प्रयत्नशील असेल. कर्णधार मिताली राज व अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्यासाठी हा शेवटचा वर्ल्डकप असेल. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 6.30 वाजता सुरुवात होत आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक महिनाभर आधी तेथे दाखल झाला. मात्र, फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना अधिक झगडावे लागले. 50 षटकांच्या 7 सामन्यांमध्ये भारताने 5 वेळा 250 पेक्षा अधिक धावा जमवल्या. यात दोन सराव सामन्यांचा समावेश राहिला. गोलंदाजीत मात्र भारताची निराशा झाली. संघाला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत 1-4 अशा एकतर्फी फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दोन सामन्यात तर गोलंदाजांना अगदी 270 धावांच्या आसपासच्या टार्गेटचे संरक्षण करता आले नव्हते. पाचव्या सामन्यात भारताने त्या तुलनेत थोडीफार सुधारणा नोंदवली होती.
भारताची मध्यमगती गोलंदाजीतील सर्व भिस्त प्रामुख्याने अनुभवी झुलन गोस्वामीवर असणार आहे. झुलन गोस्वामी नियमितपणाने ब्रेकथ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरत आली असून तिला मेघना सिंग, पूजा वस्त्रकार व रेणुका सिंग यांच्याकडून अधिक प्रभावी मारा अपेक्षित असेल. फिरकीपटू दीप्ती शर्माने द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक बळी घेतले. शिवाय, राजेश्वरी गायकवाड सराव सामन्यात उत्तम बहरात दिसून आली. मात्र, सातत्य तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
मिताली राज हरमनप्रीत कौरकडून गोलंदाजी करवून घेणार का, याचीही उत्सुकता असेल. बिग मॅच प्लेयर म्हणून ओळखली जाणारी हरमनप्रीत कौर बहरात परतली असल्याने संघाला दिलासा लाभला असून दीप्ती तिसऱया किंवा चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरेल, असे संकेत आहेत. कौर पाचव्या स्थानी फलंदाजीला येईल.
सलामीवीर शफाली वर्मावर मात्र दडपण असेल. तानिया भाटियाऐवजी युवा फलंदाज रिचा घोष बढतीवर येणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सर्व सहभागी संघात मानांकनाच्या आघाडीवर निचांकी स्तरावर आहे. गतवर्षी पात्रता फेरीचे सामने रद्द झाल्यानंतर पाकिस्तानला त्यावेळी असलेल्या मानांकनाच्या आधारे वर्ल्डकपचे तिकीट मिळाले.
संभाव्य संघ
भारत ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, रिचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, झुलन गोस्वामी, रेणुका सिंग.
पाकिस्तान ः अलिया रियाझ, जावेरिया खान, मुनिबा अली (यष्टीरक्षक), नहिदा खान बिस्माह मरुफ (कर्णधार), सिदा अमीन, निदा दार, अनम अमिन, ओमाईमा सोहेल, सिद्रा नवाझ (यष्टीरक्षक), एमन अन्वर, डायना बेग, फातिमा साना, गुलाम फातिमा, नश्रा संधू.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 12 धावांनी विजय
हॅमिल्टन ः महिला विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विद्यमान विजेत्या इंग्लंडविरुद्ध 12 धावांनी विजय संपादन केला. सलामीवीर रॅशेल हेन्सने 130 धावांची धुवांधार खेळी निर्णायक ठरली. या लढतीत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 310 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 बाद 298 धावांपर्यंत पोहोचता आले.
द. आफ्रिकेची विजयी सलामी
डय़ुनेडिन ः अयाबोंगा खाकाच्या उपयुक्त सीम गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने आपल्या सलामी लढतीत बांगलादेशला 32 धावांनी धूळ चारली. प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेचा डाव सर्वबाद 207 धावांमध्ये गुंडाळला गेला. मात्र, प्रत्युत्तरात बांगलादेशला सर्वबाद 175 धावांवर समाधान मानावे लागले. अयाबोंगा खाकाने 32 धावात 4 बळी घेतले.