कंटेनमेंट झोनचा एक महिना पूर्ण
प्रतिनिधी/ वास्को
वास्को मांगोरहिल मधल्या कंटेन्मेंट झोनला आज महिना पूर्ण होत आहे. गेला महिनाभर हजारो माणसे या झोनमध्ये कोंडली गेलेली आहेत. त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने आतापर्यंत अल्प चाचण्या झालेल्या आहेत. हजारो चाचण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोन मुक्त करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या कंटेन्मेंट झोनचे भवितव्य काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. लोकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे हे वारंवार दिसून आलेले आहे.
मागच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मांगोरहिलच्या दाट झोपडपट्टीत एक मासे विक्री करणारे दांपत्य कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने संबंध गोव्यात खळबळ उडाली होती. या दांपत्यापासून त्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तेथील शेजाऱयांना व हळुहळु पूर्ण वस्तीत कोरोना बाधीत आढळून येऊ लागले. मांगोरहिल हेच मुळ असलेला हा संसर्ग आता सबंध गोव्यात पसरलेला आहे. ते दांपत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून येताच मांगोरहिलची वस्ती कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आता महिना उलटला आहे. संपूर्ण वस्तीभोवती पोलीस पहारा आहे. कडक निर्बंध आहेत. कुणाला या वस्तीच्या बाहेर पडता येत नाही तर कुणाला या वस्तीत प्रवेशही करता येत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी वस्तीभोवती हे निर्बंध लावलेले असल्याने प्रारंभी स्थानिक नागरिकांनी या निर्णयाच्याबाबतीत कुणाचीच तक्रार नव्हती. मात्र, हळुहळु गैरसोयी आणि अडचणींचा सामना करावा लागल्याने या वस्तीत कंटेन्मेंट झोनविरूध्द तक्रारी वाढू लागल्या. प्रारंभी या वस्तीत आरोग्य विषयक समस्या उभ्या राहिल्या. त्या सोडवण्यासाठी लोकांना घराबाहेर रस्त्यावर यावे लागले. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, अर्थिक प्रश्न आणि कोंडमारा असे प्रश्न भेडसावू लागले. आज या वस्तीतील स्थिती गंभीर वळणावर आलेली आहे. या कंटेन्मेट झोनचे भवितव्य काय याबाबत कोणी काहीच सांगू शकत नसल्याने कोणत्याही क्षणी या वस्तीतील लोकांकडून उदेक होऊ शकतो.
कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासन ठरतेय अपयशी
वास्को मांगोरहिलची ही वस्ती गोव्यातील पहिली कंटेन्मेंट झोन ठरली. आठ दिवसांपूर्वी बायणा आणि हेडलॅण्ड सडा सारखा सुरक्षीत भागातही कोरोना बाधीत व्यक्ती सापडू लागल्याने त्यांचाही समावेश कंन्टेमेंट झोनमध्ये करावा लागला. आता झुआरीनगर आणि गोव्यातील इतर भागातही कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच कंटेन्मेंट झोन ठिकठिकाणच्या परिस्थितीनुसार जाहीर करण्यात येत असला तरी अशाने खरेच संसर्ग रोखला जात आहे का असा प्रश्न मांगोरहिल आणि वास्कोतील इतर भागात पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे पडत आहे. आजच्या घडीस मांगोरहिलसह वास्को परीसरात पाचशेहून अधिक कोरोना बाधीत आढळले आहेत. कंटेन्मेंट झोनचे जे काही नियम आहेत, ज्या काही गोष्टी प्रशासनाने करण्याची गरज आहे त्या प्रत्यक्षात करणे व पाळणे प्रशासनाला आणि लोकांना शक्य होतेय का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मांगोरहिलचाच प्रश्न लक्षात घेतल्यास या वस्तीत झटपट प्रक्रिया उरकण्यास प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलेले असल्याचे स्थानिक लोकांकडून बोलले जाते. मांगोरहिलच्या कंटेन्मेंट झोनमधील कुटुंबांना दैनंदिन जीवनाला आवश्यक असलेल्या वस्तू पुरवण्यासही सरकारला जमलेले नाही. पैसा देऊन विकत घेऊ ईच्छीणाऱयांचीही सोय झाली नाही आणि मोफत मिळवण्याची प्रतिक्षा करणाऱयांनाही तिष्ठतच राहावे लागले आहे.
केवळ दाळ आणि तांदुळ नव्हे, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवा
या वस्तीतील काही लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयानुसार कोरोनाचा प्रसार रोखला जावा व वस्तीही पूर्णपणे कोरोना मुक्त व्हावी या ईच्छेनेच लोकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले होते. मात्र, माणसाना जगायला काय हवे हेच प्रशासन विसरल्याचा अनुभव काही दिवसांनंतर येऊ लागला. केवळ तांदुळ आणि डाळ याच्यावरच माणसे जगतात काय असा प्रश्न लोक करतात. मिट, मसाला, साबण, दंतमंजन, भाज्या, कडधान्य अशा अनेक गोष्टी लोकांना दरदिवसा लागतात. घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसल्यास त्या आवश्यक गोष्टी पुरवण्याची सोय कुणी करावी असा प्रश्न लोक करतात. स्थानिक नगरसेवक सैफुल्ला खान गेला महिनाभर कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या मतानुसार कंटेन्मेंट झोन जाहीर करताना प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला लागणाऱया दैनंदिन वस्तू घराघरात उपलब्ध करण्याची सोय करायला हवी होती असे स्पष्ट केले. स्थानिक आमदार व मुरगाव पालिका यांच्या मदतीनेही हे काम पूर्ण करता आले असते. रेशन कार्डची अट न घालता प्रत्येक कुटुंबाला ही मदत मिळायला हवी. कंटेन्मेंट झोनच्या निर्बधांमुळे या वस्तीत स्वच्छतेचे प्रश्नही निर्माण झालेले असल्याचे ते म्हणाले. मुरगावचे नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी वास्कोतील कंटेन्मेंट झोन हा एक घोळ असल्याचे स्पष्ट करून हा झोन जाहीर करण्यापूर्वी या वस्तीचा कोणताही अभ्यास झाला नव्हता असे दिसून येते. त्यामुळेच सारा सावळा गोंधळ चाललेला असल्याचे ते म्हणाले.
बेरोजगार, आर्थिक विवंचना आणि कोंडमारा
मांगोरहिलच्या या कंटेन्मेंट झोनमध्ये मजूर, छोटे छोटे व्यापारी, खासगी नोकऱया, टॅक्सी चालक अशा वर्गातील लोक राहतात. गेला महिनाभर हे लोक काम धंदय़ावीना आहेत. त्यामुळे आता आर्थिक विवंचनाही सुरू झाली आहे. जगण्यासाठी आवश्यक वस्तू मिळत नाहीत आणि पोलीस घराबाहेरही पडू देत नाहीत. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. वस्तू उपलब्ध केल्यास खरेदी करण्याचीही ऐपत आता रोजगाराअभावी राहिलेली नाही. त्यामुळे बहुतेक कुटुंबांचा आर्थिक भार आता प्रशासनालाच स्विकारावा लागणार आहे. सरकारची ती तयारी आहे काय असा प्रश्न आहे. या वस्तीतील खासगी नोकरांना आता आपली रोजीरोटी गमवावी लागण्याची भिती आहे. गेला महिनाभर ते कामावर हजर राहिलेले नाहीत.
कंटेन्मेंट झोनमध्ये शारीरीक दूरीला संधीच नाही
मांगोरहिलच्या कंटेन्मेंट झोनचे वैशिष्ठ म्हणजे या वस्तीतील बहुतेक सर्व कुटुंबे पंधरा ते पंचवीस चौ. मि. च्या खोल्यांमध्ये राहतात. काही घरांवर पोट मजलेही आहेत. ही घरे एकमेकांना भिडून आहेत. या खोल्यांमध्ये या लोकांचा कोंडमारा होत असतो. त्यामुळे ते जास्तवेळ खोलीत राहू शकत नाहीत. तरीसुध्दा कंटेन्मेंट झोनच्या नियमानुसार रस्त्यावर आल्यावर त्यांना पोलीसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागतो. बहुतेक लोक खोल्यांबाहेर व गल्ली गल्लीत फिरत असतात. शारीरीक दूरीला इथे संधीच नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कंटेन्मेट झोन रोखू शकत नसल्याचे स्पष्ट होते.
अजून किती महिने कंटेन्मेंट झोनमध्ये कोंडले जाणार, लोकांना सतावतेय भिती
उपलब्ध माहितीनुसार मांगोरहिलच्या कंटेन्मेंट झोनमध्ये साधारण दहा हजार लोक आहेत. गेल्या महिन्याभरात केवळ हजार बाराशेच्या आसपास कोविड चाचण्या झालेल्या आहेत. काही बरे होऊन आलेले कोरोना बाधीतही त्याच वस्तीत पुन्हा आलेले आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये एका महिन्यात हजार बाराशे चाचण्या तर दहा हजार लोकांच्या चाचण्या करण्यासाठी अजून किती कालावधी लागेल असा प्रश्न असून तोपर्यंत लोकांनी बंद खोलीतच कोंडून घ्यावे काय अशी भिती लोकांना सतावत आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये झटपट कोविड चाचण्या उरकून ही वस्ती कोरोनापासून मुक्त करण्यासाठी प्रशासनाने युध्द पातळीवर काम करावे असे येथील लोकांना वाटत आहे. कंटेन्मेंट झोनचा कालावधी तेथील लोकसंख्येनुसार मर्यादीत असला हवा. त्या मर्यादीत काळात सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. मात्र, वास्को मांगोरहिलच्या कंटेन्मेंट झोनचे भवितव्य काय, अजून किती महिनी त्यांना कंटेन्मेंटमध्ये कोंडून ठेवले जाणार आहे याचे उत्तर ना राज्यकर्त्यांकडे आहे ना प्रशासकीय अधिकाऱयांकडे. त्यामुळे मानवाधिकारांचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.