वृत्तसंस्था/ मेलबर्न
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया युवा संघातील सलामीवीर जेक प्रेजर मॅक्गर्क जखमी झाल्याने मायदेशी परतणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी सांगितले. अभयारण्यात गेले असताना त्याला एका माकडाने अचानक हल्ला करून चेहऱयावर ओरबाडल्याने तो जखमी झाला आहे. त्यावर उपचार करून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात येणार असून बरा झाल्यानंतर तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेस प्रयाण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवडय़ात किम्बर्ली येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलिया युवा संघ अभयारण्य पाहण्यास गेला होता. त्यावेळी अनपेक्षितपणे माकडाने हल्ला करीत मॅक्गर्कला ओरबाडल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. पण दक्षता म्हणून तो मायदेशी उपचारासाठी परतणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताने हरविले. त्यात मॅक्गर्क शून्यावरच धावचीत झाला होता. ऑस्ट्रेलिया संघ आणखी दोन सामने खेळणार असून त्यासाठी तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार आहे.