चोपडे येथील टॅक्सी व्यावसायिकांच्या धरणे आंदोलनात मागणी : विविध नेत्यांची उपस्थिती
प्रतिनिधी / मोरजी
गेल्या आठवडय़ापासून स्थानिक पर्यटक टॅक्सी मालक आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आतातरी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा सरकारला पायउतार व्हावे लागेल. जर टॅक्सी मालकांच्या मागण्या मान्य करता येत नसतील तर सत्ता सोडावी, अशी जोरदार मागणी विविध नेत्यांनी चोपडे येथे केली. मांदे मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी 18 रोजी चोपडे सर्कल येथे मांदे येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. प्रसाद शहापुरकर यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले आहे. सहानुभूतीपूर्वक विचार करून टॅक्सी मालकांच्या मागण्या मान्य कराव्या व गोवा माईल्स ऍप रद्द करण्याची मागणी केली .
धरणे आंदोलनाला विविध पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये मगोचे नेते जीत आरोलकर, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, आगारवाडा माजी सरपंच अमोल राऊत, हरमलचे पंच प्रवीण वायंगणकर, पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे संजय कोले, पंच मुकेश गडेकर व टॅक्सी व्यावसायिकांचा समावेश होता.
हे आंदोलन स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हक्कासाठी आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. चोपडे हे मध्यवर्ती ठिकाणी निवडण्याचे कारण, चोपडे-शिवोली पूल होण्यापूर्वी जाणकार टॅक्सी व्यावसायिक रात्री अपरात्री जनतेला सेवा देत होते. तेव्हा अनेक वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. आजही टॅक्सी व्यावसायिक रात्री-अपरात्री आपली सेवा देत आहेत. हे आंदोलन आता गावागावात सुरू झाले पाहिजे, त्यासाठी जनतेने सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला एकादिवसाचा वेळ काढून पंचायत पातळीवर टॅक्सी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ऍड. प्रसाद शहापुरकर यांनी केले.
पैसे नको आमचा व्यवसाय द्या : कोले
सरकार किंवा आमदाराकडे आम्ही पोट भरण्यासाठी मागत नाही, आमच्या पोटापाण्यासाठी आमच्या हक्काचा व्यवसाय द्या. आम्हाला सरकारी नोकऱया नको. गोवा माईल्स बंद करून आम्हाला न्याय. अन्यथा सरकारने स्वतःहून सत्येतून बाहेर पडावे, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय कोले यांनी केली.
मागण्या त्वरित मान्य करा : जीत आरोलकर
मांदे मतदारसंघातील सुमारे साडेसहाशे टॅक्सी व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत. टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन गावागावात प्रवेश करत आहे. या आंदोलनाला मगोचा पूर्ण पाठिंबा जाहीर करून सरकारने विनाविलंब मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मगोचे नेते जीत आरोलकर यांनी केली आहे .
स्थानिकांचा व्यवसाय हिरावून घेऊ नका : देवेंद्र प्रभुदेसाई
गेले 13 दिवस राज्यातील लाखभर टॅक्सी व्यावसायिक आपल्या कुटुंबियांसह रस्त्यावर उतरले आहेत, त्याचे सरकारला काहीही पडलेले नाही. आतातर हे आंदोलन ग्रामीण पातळीवर सुरू आहे, टॅक्सी व्यावसायिक रस्त्यावर आले तरी स्थानिक आमदार आज याठिकाणी उपस्थित न राहिल्याबद्दल देवेंद्र पार्सेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. टॅक्सी एकमेव पारंपरिक व्यवसाय हा स्थानिक लोकांच्या हातात आहे, तो आता हिरावून घेऊ नये, अशी त्यांनी मागणी केली.
अन्यथा तीव्र आंदोलन करणारा : वायंगणकर
सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य करण्याची गरज आहे. भूमिपुत्रांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र होईल. अन्यथा भविष्यातील विपरित परिणामांना सरकार जबाबदार राहणार, असा इशारा दीपक वायंगणकर यांनी यावेळी दिला.
माजी सरपंच अमोल राऊत ,प्रवीण वायंगणकार आदींनी विचार मांडले.