सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.
किन्हई येथे भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भुसे म्हणाले, सेंद्रीय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी गट, महिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.