प्रतिनिधी / काणकोण
गोव्यातून पोळेमार्गे कर्नाटकात जाणाऱया वाहनातून आंध्र प्रदेशात नेण्यात येणारी अंदाजे 9 लाख रु. किमतीची देशी बनावटीची विदेशी दारू माजाळी चेकनाक्यावरील अबकारी उपनिरीक्षक आर. एन. नाईक आणि सहकाऱयांनी पकडली. हे वाहन 16 रोजी पहाटे 2.30 च्या दरम्यान पकडण्यात आले, अशी माहिती नाईक यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात या दारूची किंमत 9 लाख होते. सदर वाहन माशांची वाहतूक करणारे असून या वाहनातील 90 हजार रु. किमतीच्या पेटय़ा आणि वाहनाची किंमत धरून अंदाजे 26 लाख रुपयांची मालमत्ता कर्नाटकच्या अबकारी खात्याने जप्त केली आहे. माशांच्या रिकाम्या पेटय़ांच्या मागे दारूच्या पेटय़ा लवपून ठेवण्यात आल्या होत्या. जेव्हा या वाहनाची तपासणी करण्यात आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. सध्या वाहनचालक व क्लिनर कर्नाटकच्या अबकारी खात्याच्या ताब्यात आहे.