सावंत सरकार भ्रष्ट -सत्यपाल मलिक : वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीने राज्यात खळबळ,पंतप्रधानांकडे तक्रार केल्याने आपल्याला हटविले, विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी,आपकडून आज आझाद मैदानावर निषेध सभा
प्रतिनिधी /पणजी
एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला गोव्याचे माजी राज्यपाल तथा मेघालयाचे विद्यमान सत्यपाल मलिक यांनी कोरोना काळातील गोवा सरकारचे सर्वच व्यवहार भ्रष्टाचाराचे असे निवेदन करुन गोव्याचे विद्यमान सरकार भ्रष्टाचारी. आपण ते पंतप्रधानांपर्यंतही पोहोचविले आणि उघड केले तर आपलीच गोव्यातून बदली करण्यात आली, असे सनसनाटी निवेदन गोव्याचे माजी राज्यपाल आणि सध्याचे मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्याने संपूर्ण गोव्यात व देशात एकच खळबळ माजली आहे. गोव्यातील सर्व विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मलिक यांच्या विरोधात तक्रार मांडली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यातील भाजप सरकारवर राज्यपाल मलिक यांनी घातलेला हा बॉम्ब असे म्हणता येईल.
राज्यपाल मलिक यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीने देशात खळबळ माजली. त्यांनी गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारला भ्रष्टाचारी असे संबोधले आहे. गोवा सरकार हे कोणत्याही क्षेत्रात भ्रष्टाचार करतेय व सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार करतेय आणि आपण गोव्याचा राज्यपाल असताना आपण गोवा सरकारचा हा भ्रष्टाचार उघड करीत होतो त्यामुळेच आपल्याला गोव्यातून हटविले, अशी सनसनाटी निवेदने त्यांनी केली.
कोरोना काळातही या सरकारने भ्रष्टाचार केला. गोव्यात पूर्णतः लॉकडाऊन पाळून सारे व्यवहार बंद एवढय़ासाठीच ठेवले की, खासगी कंपनीला या दरम्यान घरपोच सामान पोहोचविण्याचा लाभ व्हावा.
राजभवन पाडण्याचा डाव आपण उधळून लावला
मेघालयाच्या राज्यपालपदाची धुरा सत्यपाल मलिक हे सांभाळत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, गोव्याचे राजभवन हे जुने पुरावे आणि ती हेरिटेज इमारत आहे. ती पाडून त्या जागी दुसरी आधुनिक इमारत बांधण्याचा गोवा सरकारचा डाव होता मात्र आपण एका खोलीत राहतो काही काळजी करु नका. परंतु या प्राचीन इमारतीला तोडू नका, असा आग्रह आपण धरला.
पंतप्रधानांना गोवा सरकारने चुकीची माहिती दिली
गोव्यात सर्व क्षेत्रात चाललेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली. मात्र गोव्यातील नेत्यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केली. पंतप्रधान हे स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्याच नेत्यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केली असे मुख्यमंत्र्यांचे नाव न घेताच राज्यपालांनी निवेदन करुन एकच खळबळ माजवून दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव न घेताच त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री आज बोलणार!
या मुलाखतीने गोव्यात एकच खळबळ उडाली. ऐन निवडणुका तोंडावर येऊन पोहोचल्या असताना राज्यपालांनी गंभीरपणे केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता, आपण यावर कोणतेही भाष्य करणार नाही. आपल्याला त्या विषयावर अभ्यास करु द्या. मंगळवारीच त्यावर भाष्य करीन असे ते म्हणाले.
विरोधक तुटून पडले, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
एका बाजूने खळबळ माजल्यानंतर दुसऱया बाजूने राज्यातील विरोधी पक्षांचे नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर तुटून पडले. काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड आणि आप या चारही प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. ‘आप’ने आज सकाळी आझाद मैदानावर डॉ. सावंत सरकार विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमीच गोमंतकीय जनतेच्या बाजूने राहिलेले आहेत व ते नेहमीच सत्य बोलतात. त्यांनी गोव्यातील भ्रष्टाचारी भाजप सरकारला उघडे पाडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सत्तेवर राहाण्याचा आता मुळीच नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरित सत्तेवरुन पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.
थोडी तरी नैतिकता शिल्लक असल्यास राजीनामा द्यावा : दीपक ढवळीकर
मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्याच्या माजी राज्यपालांनी उघडे पाडले आहे. डॉ. सावंत यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असल्यास त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन मोकळे व्हावे व केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी दीपक ढवळीकर यांनी मगो पक्षातर्फे केली आहे. दुसऱयांना भ्रष्टाचारी संबोधणाऱया डॉ. सावंत यांना खुद्द राज्यपालांनी उघडे पाडले आहे. आता जनाची नसेल तर मनाची तरी लाज बाळगून राजीनामा द्या, असे दीपक ढवळीकर म्हणाले.
राष्ट्रपती राजवट लागू करा : विजय सरदेसाई
या घटनेनंतर गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी, विद्यमान राज्यपालांनी विद्यमान भाजप मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहे. या राज्यातील जनता जेव्हा कोविडमुळे मरत होती त्यावेळी हे निर्लज्ज सरकार पैसे करत होती. राज्यपाल पिल्लई यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी करावी व विनाविलंब गोव्यात राष्ट्रपती शासन लागू करावे, असे म्हटले आहे.
सत्तेवरुन पायउतार व्हा : राहुल म्हांबरे
आपचे गोव्याचे नेते राहुल म्हांबरे यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवेदनाचे स्वागत केले. एवढे दिवस आप जे काही या सत्कारबाबत सांगत आहे ते सत्य ठरले. भाजपच्या गोवा सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भ्रष्टाचारी आहेत व त्यांनी सत्तेवर राहाण्याचा अधिकार गमावला आहे, असे म्हटले आहे व आज मंगळवारी सकाळी 11 वा. आझाद मैदानावर आपतर्फे या सरकारचा निषेध नोंदविला जाईल, असे म्हटले आहे.
भाजपने आता कोरोना भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढावा : कांदोळकर
कोविड महामारी काळात राज्यात मोठय़ाप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटल्याने सरकारचे पितळ आता उघडे पडले आहे. यावरून भाजपची पाळेमुळे भ्रष्टाचारात किती खोल गेली आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यात आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या विरोधात भाजपाने आता मोर्चा काढावा, अशी मागणी गोवा फ्ढाŸरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केली.
चुकीचे व खोटे निवेदन : तानावडे
दरम्यान, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी राज्यपालपदावर असणाऱया व्यक्तीने अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करण्यापूर्वी खरेतर विचार करणे आवश्यक होते. आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांकडे मलिक यांच्या विरोधात तक्रार आहोत. राज्यपालांनी जे निवेदन केलेले आहे ते तथ्यहिन व चुकीचे आहे, असे ते म्हणाले.