सर्वसाधारण सभा खेळीमेळीत : सभासदांना 12 टक्के लाभांश
बेळगाव : येळ्ळूर येथील नवहिंद को-ऑप. पेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात 91 लाख 68 हजार रुपये नफा झाला. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येईल, अशी माहिती चेअरमन उदय जाधव यांनी 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली.
संस्थेकडे 266 कोटींचे खेळते भांडवल, 42 कोटी रुपये गुंतवणूक, 247 कोटी रुपये ठेवी जमा आहेत. तसेच 203 कोटी रुपये कर्जे दिली आहेत, असेही ते म्हणाले.
प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात व्यासपीठावर चेअरमन उदय जाधव, व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक पी. एस. मुरकुटे, सी. बी. पाटील, प्रकाश अष्टेकर, एस. वाय. चौगुले, नीता जाधव, बी. आर. पुण्यान्नावर, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नवहिंद मल्टिपर्पजचे चेअरमन डी. एन. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सभेत सदाशिवनगर शाखेचे व्यवस्थापक जे. बी. शहापूरकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. ढोलगरवाडी शाखेचे व्यवस्थापक विनोद पाटील यांनी ताळेबंदपत्रक सादर केले. उद्यमबाग शाखेचे व्यवस्थापक एस. के. बामणे यांनी नफातोटा पत्रकाला मंजुरी घेतली. मुतगा शाखेचे व्यवस्थापक निलेश नाईक यांनी नफा विभागणी, वडगाव शाखेचे व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी सन 2021-22 सालाच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले व मंजुरी घेतली.
नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे संचालक आनंद पाटील यांनी कोरोना काळातही संस्थेने गतिमान प्रगती साधली असल्याचे गौरवोद्गार काढले. संचालक अनिल हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले. सभेस सभासद, असि. जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर, वसुली अधिकारी जे. एस. नांदूरकर, हेड ऑफिस इन्चार्ज विवेक मोहिते, सर्व शाखाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.