कोल्हापूर / प्रतिनिधी
पैसे पडल्याचा बहाणा करून भामट्यांनी भर दिवस माथाडी कामगारांचे दीड लाख रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. दसरा चौक परिसरात भरदिवसा 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बाबतची फिर्याद पांडुरंग शामराव भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की पांडुरंग भोसले हे शासकीय धान्य गोदाम येथे माथाडी कामगार आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता पगार व बोनसचे पैसे काढण्यासाठी ते दसरा चौकातील एका राष्ट्रीय कृत बँकेत आले होते. 12 वाजण्याच्या सुमारास ते दीड लाख रुपयांची रोकड घेऊन बँकेच्या दारात थांबले होते. ही रोकड त्यांनी एक कापडी पिशवीत ठेवली होती. या वेळी त्यांचा जवळ एक तरुण आला, त्याने पांडुरंग भोसले यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. यामुळे भोसले पैसे पाहण्यासाठी गेले. याच दरम्यान त्या तरुणाने भोसले यांच्या हातातील पिशवी हिसडा मारून नेली. भोसले यांनी आरडा ओरडा केला, मात्र दुचाकीवरून आलेल्या अन्य साथिदारा सोबत धूम ठोकली. अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहात.