वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद मास्टर्स 1000 खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार शेपोव्हॅलोव्ह यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह आणि टीम प्यूझ या जोडीने भारताच्या बोपण्णा आणि शेपोव्हॅलोव्ह यांचा 6-4, 3-6, 10-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात बोपण्णा आणि शेपोव्हॅलोव्ह यांच्याकडून पाच दुहेरी चुका झाल्या.
ब्रिटनचा अँडी मरे दुखापतीनंतर पुन्हा टेनिस क्षेत्रात आगमन करणार असून त्याने रविवारी रोममध्ये सर्बियाचा जोकोव्हिच आणि अर्जेंटिनाचा श्वार्त्झमन यांच्याबरोबर सराव करणार आहे. ब्रिटनच्या मरेने एटीपी टूरवरील आपला शेवटचा सामना रोटरडॅम स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो टेनिसपासून अलिप्त राहिला होता. गेल्या महिन्यात झालेल्या मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून स्नायू दुखापतीमुळे मरेला माघार घ्यावी लागली होती.
व्हेरेव्हकडून नदालला पराभवाचा धक्का
या स्पर्धेत शुक्रवारी जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का देत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
शुक्रवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हेरेव्हने नदालचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. पाचव्या मानांकित व्हेरेव्हचा उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमशी होणार आहे. तृतीय मानांकित थिएमने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.