वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सध्याला जगात सर्वत्रच कोरोनाचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात जाणवत असून याचा फटका व्यापार उद्योगालाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कर्मचाऱयांची भरती करण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी मायक्रोसॉफ्ट तयार झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत ही दिलासा देणारी बातमी म्हणता येईल.
अमेरिकेतील कंपनी येणाऱया काळात भारतात आर्थिक गुंतवणूक करण्याबरोबरच कर्मचाऱयांची भरती करणार आहे. सध्याला डिजीटल क्षेत्राला चांगले दिवस आले असून मायक्रोसॉफ्ट डाटा केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीची सध्या 3 डाटा केंद्रे भारतात कार्यरत आहेत. या केंद्रांवर कर्मचाऱयांची संख्या वाढवण्याचा कंपनीचा इरादा असल्याची माहिती मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी दिली. सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरीचा शोध घेऊ इच्छिणाऱयांना ही संधी उपलब्ध होणार आहे.
येणाऱया काळात भारतात व्यवसाय विस्ताराचा विचार असून या अनुषंगाने नव्या कर्मचाऱयांची भरती करण्याचे प्रयोजन कंपनीने केले आहे. डिजीटल व्यवसाय, व्यवहारात अलीकडच्या काळात मोठी वाढ दिसली आहे. ऑनलाइन व्यवहारांनी तेजी दर्शवली आहे. तंत्रज्ञानाची वाढती गरज लक्षात घेऊन यातील जास्तीत जास्त सेवांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जाणार आहे. कोविडच्या काळामध्ये कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. यात कर्मचाऱयांचे सहकार्य उत्तमपणे लाभले असल्याचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात आवश्यक ती सेवा देण्यासाठी कंपनीने प्रयत्न केले असून ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून भविष्यात चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी कंपनी तत्पर असेल, असेही अनंत माहेश्वरी यांनी सांगितले.