ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा 26 वर्षीय मुलगा जेन नाडेला यांचे सोमवारी निधन झालं. जेन नाडेला याला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी हा आजार होता. मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या मेलमध्ये जेन नडेला यांचे सोमवारी सकाळी निधन झाल्याचे सांगितले आहे. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना नडेला यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. 2014 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम स्वीकारल्यापासून, सत्या नाडेला अपंगत्वाने ग्रस्त युजर्सला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी उत्पादनांच्या डिझाइनवर जोर देत आहेत. या कामात त्यांनी जेनची सेवा करताना मिळालेल्या अनुभवांचाही आधार घेतला.
जेनचा बहुतांश वेळ अमेरिकेतील सिएटल येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये गेला. येथे गेल्या वर्षी सत्या नाडेला यांनी मेंदूच्या आजारांवर एकात्मिक संशोधन करण्यासाठी जेन नाडेला न्यूरो सायन्सेस सेंटरची स्थापना केली, असेही मायक्रोसॉफ्टने मेलमध्ये म्हटले आहे.