वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को :
जगभरातील कोरोना विषाणूचा वेगाने वाढणारा संसर्ग जगभरातील व्यापार उद्योगांवर परिणाम करीत आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांना याचा जादा फटका बसत असल्याचे अनुमान आहे. सध्या ट्विटर, गुगल या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. असाच निर्णय आता मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे. सिएटल आणि सॅन फ्रॉन्सिस्को मधील कर्मचाऱयांना 25 मार्चपर्यंत घरातून काम करण्यासाठी सवलत दिली आहे. कंपनीने जवळपास 54 हजार कर्मचाऱयांना या प्रकारची सवलत देऊ केली आहे.
आमचे ध्येय कोरोनाला थोपवणे
ज्या कर्मचाऱयांला आपण आजारी आहोत, असे जाणवत असल्यास त्यानी येत्या 25 मार्चपर्यंत आपले काम घरातूनच केले तरी चालेल अशा सूचना कंपनीचे उपकार्यकारी अध्यक्ष कर्ट डी बेन यांनी दिल्या आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवत कामाचे ठिकाणही सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे, की आम्ही हे सर्व कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी भर देणार असल्याचेही म्हटले आहे.