जुनेबेळगावजवळ वाहतूक पोलिसांनी केली होती मारहाण
प्रतिनिधी/ बेळगाव
जुनेबेळगावजवळील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर उप्पार गल्ली, खासबाग येथील एका युवकाला वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांनी या घटनेची दखल घेत चौकशी केली आहे.
गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. अभिजित गोपाळ लोहार (वय 35) रा. उप्पार गल्ली, खासबाग हा युवक मारहाणीत जखमी झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस अधिकाऱयांना जाब विचारल्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याचे व्हिडिओत दिसून येत होते.
यासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओवरून पोलीस उपायुक्त चंदशेखर निलगार यांनी अभिजितला बोलावून त्याची चौकशी केली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना कशी घडली? मारहाण कशामुळे झाली? आदींविषयी पोलीस उपायुक्तांनी अभिजितकडून माहिती घेतली आहे. यासंबंधी ‘तरुण भारत’ने पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला असता आपण संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेत नेमकी चूक कोणाची आहे? आदीविषयी चौकशी झाली आहे. वाहनांची तपासणी सुरू असताना वाहतूक पोलिसाने दुचाकीला हात केला. दुचाकीस्वार थांबला नाही, त्यावेळी काठी लागून अभिजित जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओत पोलिसाकडून मारहाण झाल्याचे अभिजित वारंवार सांगतानाची दृश्ये आहेत.