जानेवारीपासून दर वाढण्याचे संकेत : कच्च्या मालाच्या वाढीव दराचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय कार बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱया मारूती सुझुकीने कार्सच्या किंमती वाढवण्याबाबत सुतोवाच केले आहे. जानेवारीपासून वाहनांच्या किंमती वाढण्याचे संकेत आहेत.
देशातील आघाडीवरची सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी म्हणून मारूती सुझुकीची ओळख आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील कार विक्रीत 2.4 टक्क्यांची घसरण झाली होती. मारुती सुझुकीने एकूण 1.35 लाख कार्सची विक्री केली आहे. नोव्हेंबरमध्ये वाहन क्षेत्रातील प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 4.17 टक्क्यांनी वधारली असून हा आकडा 2.91 लाखावर पोहोचला आहे.
कार बाजारात आपला दबदबा निर्माण करणारी मारुती सुझुकी कंपनी मात्र जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्यासाठीची तयारी करत असल्याची माहिती आहे. कच्चा मालाच्या वाढलेल्या किमती आणि त्यामधून नवीन उत्पादन करताना अधिकचा येणारा खर्च यामुळे दर वाढवावे लागणार असल्याचे कळते. यामुळे नवीन वर्षातील वाहन खरेदी महागणार असल्याचे संकेत असून याचा फटका वाहन खरेदीदारांना होणार असल्याची भीती वाहन क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
मारुतीसोबत अन्य कंपन्याही आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कारण येणाऱया काळात कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यास त्याचा फटका उत्पादन खर्चावर होणार असल्याचीही माहिती आहे.
मॉडेलनूसार किमती शक्य
विविध मॉडेलनुसार नव्याने किमती ठरवणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे.