पोलिसांकडून चौकशी सुरू
प्रतिनिधी / मालवण:
शहराच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी दिवसभरात वेगवेगळय़ा ठिकाणांहून पाचजण दाखल झाल्याने पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात एक व्यक्ती थेट मुंबईहून जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. दोन व्यक्ती विजयदुर्ग येथून मालवणात आल्या आहेत. मुंबईहून एक व्यक्ती आल्याचे समजते.
मालवणचे पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण आणि वासुदेव गावकर यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस यंत्रणेला माहिती दिल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
मुंबईहून थेट रुग्णालयात
मुंबई-विरार येथून एक व्यक्ती जिल्हय़ात आली होती. तिने थेट जिल्हा रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. त्याठिकाणी विलगीकरण कक्षातील मुदत संपल्यानंतर ती व्यक्ती मालवणात आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. या व्यक्तीला पुन्हा होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दुचाकीवरून तरुण दाखल
शहरालगत असलेल्या एका गावात दुचाकीवरून तरुण मुंबईहून आल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पोलीस यंत्रणेने संबंधित युवकाकडे चौकशी केली असता, त्याला मुंबईतील स्थानिक पोलीस प्रशासनाने कौटुंबिक कारणास्तव परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयदुर्ग येथून मालवणात
शहरातील विजयदुर्ग येथून दाम्पत्य आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौकशी केली. यात दोघेही लॉकडाऊनच्या पूर्वी विजयदुर्ग येथे आले होते, तेथून ते मालवणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एका व्यक्तीचा शोध सुरू
मुंबईहून एक व्यक्ती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली आहे. मात्र, ही व्यक्ती चौकशीत सापडलेली नाही. या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता. ही व्यक्ती एका बडय़ा शासकीय ठेक्याशी संबंधित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तिचा शोध लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.