रेडकर हॉस्पिटलचा उपक्रम
कोरोनामुक्ती नंतरच्या आजारांवर होणार उपचार
प्रतिनिधी / मालवण:
कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना प्रचंड थकवा, धाप लागणे, अधून- मधून ताप येणे, सांधे दुखणे, पोटऱया दुखणे, चव किंवा वास न समजणे, चक्कर येणे, वारंवार डिसेंट्री होणे, छातीत दुखणे व इतर तत्सम आजार जाणवत असल्याने या ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ आजाराच्या उपचारासाठी जिल्हय़ात प्रथमच मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे पोस्ट कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी दिली.
या संदर्भात रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर म्हणाले, सध्या कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांमध्ये ज्या रुग्णांना पूर्वीपासून जे आजार आहेत, त्यात वाढ झालेली दिसत आहे. तर पूर्वी कोणताही आजार नसताना कोरोनातून मुक्त झाल्यावर प्रचंड थकवा, चालल्यावर धाप लागणे, अधून-मधून ताप येणे, सांधे दुखणे, पोटऱया दुखणे, कोरोना होऊन तीन आठवडे झाले, तरी चव किंवा वास न समजणे, चक्कर येणे, वारंवार डिसेंट्री होणे, छातीत दुखणे असे विविध आजार होत आहेत. कोरोनानंतरच्या या आजारांवर उपचार करण्यासाठी मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने जिल्हय़ातील पहिले ‘पोस्ट कोविड हेल्थ सेंटर’ सुरू केले आहे.
तज्ञ मान्यवरांची नियुक्ती
कोविडमधून बरे झाल्यावर ज्या रुग्णांना काही त्रास जाणवतील, अशा रुग्णांच्या विविध आजारांवरील चाचण्या या सेंटरमध्ये तज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपलब्ध असणार आहेत. कोविडमधून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांवर आधुनिक वैद्यक शास्त्र, आयुर्वेद व होमिओपॅथी यांच्या होणाऱया संशोधनाचाही या प्रकल्पात समावेश आहे. पोस्ट कोविड सेंटरच्या टिममधे सिनिअर फिजिशियन व डायरेक्टर डॉ. विवेक रेडकर यांच्यासोबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन खानोलकर, बालरोग तज्ञ डॉ. हरिश परुळेकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. दयानंद क्षिरसागर, नेत्रतज्ञ डॉ. कुलकर्णी, मानसशास्त्र तज्ञ डॉ. प्रियंका सहस्त्रभोजनी, आयुर्वेद तज्ञ डॉ. रामचंद्र चव्हाण, होमिओपॅथी तज्ञ डॉ. मोहन जगताप, आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरस्कर, कोविड इन्चार्ज डॉ. लक्ष्मण मोर्वेकर, डायबेटीस एज्युकेटर सौ. श्रुती हिर्लेकर, पल्मनरी फिजिओथेरपिस्ट उन्मेश पटवारी यांचा समावेश आहे. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी उपस्थित होते.
को-वॅक्सीनची दुसऱया टप्प्याची चाचणी यशस्वी!
संपूर्ण भारतातून निवड केलेल्या बारा सेंटरपैकी धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरमधे डॉ. सागर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या कोवॅक्सीनची दुसऱया टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. समर्पित कोविड सेंटर उभारल्यानंतर कोरोना पश्चात उद्भवणाऱया शारीरिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून या ‘पोस्ट कोविड हेल्थ सेंटर’चे महत्वाचे योगदान राहील, अशी आशा संस्थेतर्फे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली.