प्रतिनिधी/ फोंडा
अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका बिगरगोमंतकीय युवकाला फोंडा पोलिसांनी अटक केली. सुरज रामप्रताप साह (30, मूळ बिहार, रा. कुंभारजुवे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रा. वजनाचा सुमारे रू. 1 लाख 30 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. शुक्रवारी उशिरा रात्री माशेल बसस्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारजुवे येथून संशयित युवक माशेल बसस्थानकाजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. संशयिताने खांद्याला बॅग लटविण्यात आली होती. साधारण 1 किलो 300 ग्राम वजनाच्या गांजासह त्याला ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिथ पिल्ले, नारायण पिंगे, हवालदार केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, पोलिस शिपाई अमेय गोसावी, मयुर देसाई, आदित्य नाईक यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याची पोलिस कोठडीत रवनगी करण्यात आली आहे.