प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले आहेत. यामध्ये विविध पेन्शनवर आपली गुजराण करणाऱया नागरिकांची परवड होत आहे. पेन्शनधारकांना जून महिन्यातील पेन्शन अजूनही जमा न झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बऱयाच पेन्शनधारकांना मार्चपासूनची पेन्शन जमा झाली नाही. काहींना एप्रिलमध्ये दोन महिन्यांची पेन्शन एकाच वेळी देण्यात आली. एकंदरीत अशा कारभाराचा फटका जिल्हय़ातील हजारो पेन्शनधारकांना बसला आहे.
वृद्धाप वेतन, दिव्यांग, विधवा अशा विविध घटकांतील नागरिकांसाठी सरकारने मासिक पेन्शनची व्यवस्था केली आहे. या अंतर्गत संबंधित नागरिकांच्या बँक किंवा पोस्ट बचत खात्यावर दर महिन्यास ठराविक रक्कम जमा होत असते. लॉकडाऊनच्या कालावधीत वृद्ध, दिव्यांग, विधवा आदींना बराच त्रास सोसावा लागला होता. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न आल्याने पेन्शन घेणे दुरापास्त बनले होते. याची दखल घेऊन एप्रिलमध्ये एप्रिल व मे अशा दोन महिन्यांची पेन्शनची रक्कम एकाचवेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मासिक पेन्शनवर अवलंबून असणाऱया असंख्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, काहींच्या खात्यामध्ये मार्चपासून पेन्शनची रक्कम जमाच झाली नाही. तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे अधिकारीवर्गाचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे या मंडळींचे मोठे हाल सुरू आहेत. दिव्यांग तसेच वृद्धमंडळींना आणि विधवा महिलांना औषधोपचार आणि अन्य गरजा भागविण्यासाठी या पेन्शनच्या रकमेचा मोठा आधार आहे. मात्र, जूनमधील पेन्शन अद्यापही खात्यात जमा न झाल्याने या मंडळींची परवड सुरू झाली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगावर परिणाम झाले आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. असंख्य घरातील वृद्ध किंवा दिव्यांग व्यक्तींना या पेन्शनवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, दर महिन्यास पेन्शनबाबत नेहमीच तक्रारी सुरू झाल्या आहेत. यामुळे पेन्शनधारकांची एकप्रकारे थट्टाच सुरू आहे. एकीकडे लॉकडाऊन काळात कोणत्याही पेन्शनधारकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सरकारवतीने करण्यात आली असताना खरी परिस्थिती वेगळीच आहे. यामुळे पेन्शनधारकांना दर महिन्यास पेन्शनसाठी चातकासारखी वाट पाहावी लागत आहे.