कराड ग्रामीण पोलिसांची कारवाई, अनैतिक संबधांच्या संशयावरून काढला काटा
प्रतिनिधी/ कराड
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून करवडी (ता. कराड) येथील वाघेरी फाटय़ानजीक एकाच्या डोळ्यात चटणी टाकून तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. खून प्रकरणाचा छडा लावण्यात कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे. खूनप्रकरणी मुख्य संशयितासह चौघांना पोलिसांनी 24 तासांच्या आत सापळा रचून गजाआड केले. संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.
रमेश रामचंद्र पवार (वय 40 रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी दीपक उर्फ बाळकृष्ण शरद इंगळे (वय 38, रा. आर्वी, ता. कोरेगाव), संदीप सुभाष इंगळे (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव), आप्पा उर्फ धनाजी इंगळे (वय 28, रा. कारंडवाडी, ता. सातारा), गणेश विठ्ठल भोसले (वय 23, रा. कारंडवाडी, ता. सातारा) या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती कराड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रमेश पवार व त्याचा भाऊ नवनाथ पवार हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. संशयित दीपक इंगळे व मृत रमेश पवार हे वर्गमित्र होते.
आडवून काटा काढण्याचा कट
रमेशचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय दीपकला होता, असे पोलिसांनी सांगितले. या संशयावरून दीपकचा रमेशवर राग होता. दरम्यान, शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी याच्या बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराड मार्केट येथे आला होता. भाजीपाला खरेदी करून आर्वीकडे परत निघाले असताना कराड-पुसेसावळी रोडवरील वाघेरी फाटय़ानजीक पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीने बोलेरोला गाडी आडवी मारून थांबवले. संशयित हल्लेखोर दीपक इंगळे, संदीप इंगळे व त्यांच्या दोन साथीदारांनी रमेशला बाहेर ओढत त्याच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. दिपकने तवेरा गाडीतून आणलेल्या तलवारीसारख्या हत्याराने रमेशवर वार केले. त्याचबरोबर संदीप व अन्य दोघांनी रमेश यास लाकडी दांडक्याने मारहाण केली यात रमेशचा मृत्यू झाला.
हल्लेखोर पसार…पोलीस तपासाला गती
घटनेनंतर संशयितांनी पोबारा केला. संशयित हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पथके रवाना केली होती. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कांबळे यांनी सातारा भागात हल्लेखोरांचा शोध घेत माग काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिसांचे दुसरे पथक वाठार, पाचवड, वीर धरण, पुरंदर भागात हल्लेखोरांचा शोध घेत होते. एसपी अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, डीवायएसपी रणजीत पाटील हे तपास प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवून होते. पोलीस निरीक्षक खोबरे यांना संशयित सातारा एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कांबळे, धनंजय कोळी यांच्यासह पोलिसांनी सातारा येथे सापळा रचून हल्लेखोरांचा रात्रभर शोध घेतला.
थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या
मुख्य संशयित दीपक आणि संदीप हे तवेरातून एमआयडीसी परिसरात फिरताना गुन्हे प्रकटीरण शाखेच्या पथकाला आढळल्यावर त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान त्यांचे अन्य दोन साथीदार पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस हवालदार सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे यांनी पाठलाग करून त्यांना पकडले. कराड परिसरात खुनाचे सत्र सुरू असतानाच अवघ्या 24 तासात हल्लेखोरांना गजाआड करण्यात कराड ग्रामीण पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी कौतुक केले आहे.