वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित ः 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांना भेटीला
हुमा कुरैशीसाठी फेब्रुवारीचा महिना महत्त्वाचा ठरला आहे. ओटीटीपासून चित्रपटगृहापर्यंत हुमा स्वतःच्या अभिनयाची जादू दाखविताना दिसून येईल. 24 फेब्रुवारीला तिचा चित्रपट वलिमै चित्रपटगृहात प्रदर्शित होतो. हा तमिळ चित्रपट असला तरी हिंदीत देखील प्रदर्शित होतोय. या चित्रपटात तमिळ स्टार अजीत कुमारसोबत ती झळकणार आहे.
तर ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर हुमा कुरैशीची वेबसीरिज मिथ्या प्रदर्शित होणार असून यात तिच्यासोबत अवंतिका दसानी मुख्य भूमिकेत दिसून येईल. भाग्यश्रीची मुलगी अवंतिकाचे अभिनयाच्या क्षेत्रातील पदार्पण असणार आहे. 6 एपिसोड्सची सायकोलॉजिकल थ्रिलर वेबसीरिज मिथ्या 18 रोजी प्रदर्शित होतेय. बुधवारी या सीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे.
सीरिजचे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे. तर परमव्रत चॅटर्जी, रजत कपूर आणि समीर सोनी देखील या सीरिजमध्ये दिसून येणार आहेत. सीरिजची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटने केली आहे. बीबीसी सीरिज ‘चीट’चे मिथ्या हे भारतीय रुपांतरण आहे. मिथ्या एक तणावपूर्ण आणि ड्रामाटिक थ्रिलर असल्याचे रोहन सिप्पी यांनी म्हटले आहे.