मिरज / प्रतिनिधी
शहरातील सांगलीकर मळा परिसरात असणाऱ्या ऑक्सिजन पार्कमध्ये रविवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत ऑक्सिजन पार्कमधील कंपाउंड लगत असणारी बांबुची झाडे भस्मसात झाली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फेऱ्यात ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कमानवेस भागात सांगलीकर मळ्यालगत पटवर्धन बिल्डर्स यांचे ऑक्सिजन पार्क आहे. येथे बांबुच्या झाडांसह विविध प्रकारची फुल आणि फळांची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मिरज शहरातील अनेक नागरिक पहाटे आणि सायंकाळी या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरावयास जातात. मोठी गर्दी याठिकाणी असते. ऑक्सिजन पार्कमध्ये नेहमी नागरिकांची गजबज असते.
सध्या हिवाळ्यातील पानगळीचे दिवस नुकतेच संपले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन पार्क आणि परिसरात झाडांची पानगळ होऊन सुकलेली पाने पडली आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञाताने या पार्कलगत शेकोटी पेटविली आणि त्याची धग ऑक्सिजन पार्कमधील कंपाऊंडलगत असलेल्या बांबुच्या झाडांना लागली. त्यामुळे बांबुच्या झाडांनी पेट घेतला. पहाटे वाराही जोराने वहात असल्याने आग पसरत जावून कंपाऊंडलगत असणारी बांबुची झाडे भस्मसात झाली. तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यानी अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यावर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान रोहित निकम, संतोष हाक्के, निंगाप्पा कांबळे हे गाडीसह दाखल झाले. त्यांनी गाडीच्या दोन फेऱ्या करुन आग आटोक्यात आणली.