मनपा प्रशासन-ठेकेदाराच्या खाबूगिरीविरोधात रस्त्यावर उतरणार : गजानन मगदुम यांचा इशारा
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड ते सुतगिरणीपर्यंत डांबरीकरणासाठी मंजूर असलेला तेराशे मीटर लांबीचा रस्ता मनपाच्या आशिर्वादाने केवळ हजार मीटरमध्येच गुंडाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील तीनशे मीटरचा रस्ता कोणी मिळून खाल्ला? या भ्रष्ट कारभाराला जबाबदार कोण? असा सवाल व्यक्त करून मनपा प्रशासनाचा मनमानी कारभार आणि ठेकेदाराच्या खाबूगिरीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा नगरसेबक गजानन मगदुम यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला.
१५ मीटर रुंदी आणि १२०० मीटरमध्ये वाढीव १० टक्के मंजूरीप्रमाणे एकूण १३२० मीटर लांबीनुसार रस्ता होणे गरजेचे होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने केवळ हजार मीटरमध्येच रस्त्याचे काम गुंडाळले आहे. याबाबत प्रशासन व अन्य नगरसेबक चिडीचुप आहेत. यात भ्र्ष्टाचार झाल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे उर्वरित मंजूर काम तात्काळ पूर्ण न झाल्यास कुपवाडकरांना सोबत घेऊन १८ फेब्रुवारीला होणारी मनपाची महासभा मुख्य रस्त्यावरील खड्डयात बसून करून आंदोलनाद्वारे मनपा प्रशासनाचा निषेध करणार असाही इशारा नगरसेबक मगदुम, युवानेते विजय खोत यांसह विविध संघटना व नागरिकांनी दिला आहे