१२ दिवसानंतर दिल्ली आणि पुणे प्रयोग शाळेचा अहवाल
मिरज / प्रतिनिधी
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना बाधित आढळलेल्या 97 विद्यार्थ्यांचा ओमायक्रॉन चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. यातील ५५ विद्यार्थिनीचा ओमीक्रोन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ दिवसानंतर पुणे आणि दिल्लीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थी कोरोना मुक्त झाले आहे. ओमायक्रोन अहवाल पॉझिटीव्ह आला असला तरी विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण सिव्हील प्रशासनाने केले आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणारे 97 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. या सर्व विद्यार्थ्यांवर मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनाचा उत्परिवर्तीत विषाणू ओमायक्रॉन असल्याने सदर विद्यार्थ्यांच्या ओमायक्रॉन चाचणीसाठी त्यांचा स्वॅब पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा आणि दिल्ली येथे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. जवळपास १२ दिवसानंतर हा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र काळजी करण्यासारख काही नसल्याचे सिव्हील प्रशासनाने सांगितले आहे.