पोलिसांशी हुज्जत घालून व्हीडीओ काढणे पडले महागात
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागू असताना शहरात मोकाट फिरताना पोलिसांनी पकडून अँटीजन चाचणी करण्यास सांगितले असता, पोलिसांशी हुज्जत घालून व्हीडीओ शुटींग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. सक्तीने अँटीजन केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. बुधवारी सकाळी दत्त चौक येथे हा प्रकार घडला.
दत्त चौक येथे बुधवारी सकाळपासून पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईची संयुक्त मोहिम सुरू केली होती. भाजी बाजारात गर्दी करणाऱ्यांना पकडून सक्तीने अँटीजन चाचणी करण्यात येत होते. त्यावेळी एक तरुण मोटारसायकलीवरुन जात होता. पोलिसांनी त्याला पकडून अँटीजन चाचणी करण्यासाठी रांगेत उभे केले. मात्र, त्याने अँटीजन टेस्ट करण्यासाठी नकार दिला.
इतक्यावरच न थांबता त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. मी चाचणी करणार नाही, असे तो जोरजोरात ओरडत होता. अखेर पोलिसांना त्याला पकडून चाचणी करण्यासाठी नेले असता त्याने मोबाईलवर पोलिसांचा शुटींग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या पोलिसांना सदर तरुणाला बदडून काढले. अखेर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तरुणास समज देऊन चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.