ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू होत आहे. या टप्प्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोरोना लसीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यास आज दुपारी 4 वाजता सुरूवात झाली. या ॲपवर नोंदणीसाठी एकाच वेळी अनेक लोकांनी उडय़ा घेतल्याने ॲपचा सर्व्हर डाऊन झाला आहे. नागरिकांना ओटीपी येण्यास अडचण येत आहे.
18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना लस घेता येणार नाही. त्यामुळे अनेकांनी सरकारने सांगितलेल्या कोविन ॲप आणि वेबसाईटसाठी प्रयत्न केले. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांच्या पदरी निराशा आली.