प्रतिनिधी /पणजी
भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करा, अन्यथा न्यायालायत दाद मागणार, असा इशारा महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.
माजी मंत्री नाईक यांच्याविरुद्ध अद्याप एफआयआर का दाखल केली गेला नाही, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी पणजी येथील महिला पोलिसांना केला.
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध मतदारसंघातील महिला यावेळी उपस्थित होत्या. भाजपचे नेते तथा मुरगावच्या आमदारावर गुन्हा का दाखल झाला नाही, याचे उत्तर महिला पोलिस स्थानकातील अधिकारी देऊ शकले नाहीत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी 15 डिसेंबर रोजी मिलिंद नाईक यांच्या विरोधात सेक्स स्कँडल प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता एक महिना उलटून गेला तरीही पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंद केलेली नाही, असे बीना नाईक म्हणाल्या.
संकल्प आमोणकर यांचा भाजप सरकारकडून छळ केला जात आहे. आणि पीडितेने केलेल्या तक्रारीच्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी क्राईम ब्रांचकडे बोलावले जात आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
पीडितेने बिहार पोलिस ठाण्यात संकल्प आमोणकर विरोधात तक्रार दाखल करताच, ती मुरगाव पोलिस ठाण्यात हस्तांतर करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच वेगाने गोवा पोलिसांनी मिलिंद नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. गोवा पोलिसांनी असे का केले नाही, असा सवाल बिना नाईक यांनी केला.
महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे, मात्र भाजप सरकार मिलिंद नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. गुन्हेगारांना संरक्षण दिल्यावर गोव्यात महिला सुरक्षित कशा राहतील, असाही प्रश्न बीना नाईक यांनी केला.
पोलीस मिलिंद नाईक यांच्यावर गुन्हा न नांदविल्यास न्यायालयात धाव घेणार, असा इशारा ऍड वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी दिला. संकल्प आमोणकर यांना मुरगावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी पोलिसांच्या आडून गुन्हे शाखेत बोलावून चौकशी करून भाजपकडून त्रास दिला जात आहे, असा आरोपही म्हार्दोळकर यांनी यावेळी केला.
भाजपच्या इशाऱयावर पोलिसांचे काम
काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पोलिस अधिकाऱयांनाही या प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. हे पोलिस अधिकारी भाजप सरकारच्या इशाऱयावर काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. असे ऍड. म्हार्दोळकर म्हणाले. यावेळी कृत्याचा निषेध करत काँग्रेस समर्थकांनी मिलिंद नाईक यांच्या पुतळय़ाचे दहन केले.