आप चे सुदेश मयेकर यांचा आरोप : टॅक्सी चालकांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
कळंगुटचे माजी आमदार मायकल लोबो यांनी राजकीय श्रेय उपटण्यासाठी टॅक्सी चालकांचा वापर केला असा आरोप आप नेते सुदेश मयेकर यांनी केला आहे. तसेच टॅक्सी चालकांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन ’आप’ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
स्वतःच्या पत्नीला उमेदवारी देत नाही म्हणून थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही. आज लोबो काँग्रेसमध्ये आलेले असले तरी नंतर सत्तेसाठी ते त्या पक्षात राहतीलच याचा विश्वास नाही. गेली 10 वर्षे ते कॅबिनेट मंत्री होते, तरीही त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे मतदारांनी तरी अशा व्यक्तीची आश्वासने आणि विधानांवर विश्वास का ठेवावा?, असा सवाल मयेकर यांनी उपस्थित केला.
टॅक्सी चालकांची कोणतीही समस्या सोडवण्यात लोबो अपयशी ठरले आहेत. आता त्यांनी टॅक्सी चालकांचा कितीही पुळका आल्याचे भासविले असले तरी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते काँग्रेसमध्ये आलेले नाहीत. लोबो यांनी टॅक्सी चालकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, कळंगुटचा नाश केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या आश्वासनांवर शिवोलीतील लोकांनीही त्यांची विधाने आणि आश्वासनांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मयेकर यांनी केले.
जीएसटी न भरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावूनही, गोवा माइल्स राज्यात सुरू आहे. गोवा माइल्सने सरकारला 20 कोटींहून अधिक रक्कम भरलेली नाही. ही खूप मोठी रक्कम आहे. तरीही सरकार स्वतःच्या लोकांना पाठिंबा देत नाही तर राज्यातील बाहेरच्या लोकांच्या व्यवसाय वाढीस चालना देत आहे, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
अशावेळी आपचे सरकार आल्यास एक महामंडळ स्थापन करण्यात येईल, त्यात प्रामुख्याने टॅक्सी चालक असतील. त्यायोगे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते स्वतःचे निर्णय घेऊ शकतील, असे मयेकर पुढे म्हणाले. चेतन कामत यांनीही यावेळी विचार मांडले.