मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज कोकण दौऱ्यावर आहेत. . मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!विरोधी पक्ष नेते…’तीन दिवस’ तर मुख्यमंत्री… तीन तास’ व विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर उंबरठ्यावर जाऊन विचारपूस तर मुख्यमंत्र्यांचा,केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही, असा टोला देखील या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्य़ांनी विरोधकांना लगावला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी पॅकेजची घोषणा कधीपर्यंत करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘पॅकेज’वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही. सरकार वादळग्रस्त भागातील जनतेसोबत आहे. विरोधकांना उत्तर द्यायला मी इथे आलो नाही. कोकणातील जनतेला दिलासा देण्यासाठी आलो आहे. हेलिकॉप्टरमधून पाहणी करून नाही गेलो. लोकांना भेटायला आलो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. इथल्या विरोधी पक्षसारखे बोलणार नाही. माझा पंतप्रधानांवर विश्वास आहे. ते लवकरच महाराष्ट्रासाठी देखील मदत जाहीर करतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.