प्रतिनिधी /मडगाव :
केंद्रीय समितीतर्फे 2012 मध्ये डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात गुजरात, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक तामिलनाडू व गोवा या राज्यांतीतल पर्यावरण संवेदनशील विभाग (इको सेन्सेटिव्ह झोन) म्हणून एकूण 4156 झोन निश्चित करण्यात आले होते. गोव्यात एकूण 99 इको सेन्सेटिव्ह झोन घोषित केले होते, त्यातील 69 झोन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वगळले असल्याची माहिती माजी मंत्री रमेश तवडकर यांनी दिली आहे.
गोवा हे लहान राज्य आहे. गोव्याचा विकास व्हावा या हेतूने 99 इको सेन्सेटिव्ह झोनातून 69 झोन वगळले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेचे व बिगर सरकारी संस्थांचे म्हणणे ऐकून तसेच यावर अभ्यास करुन 9 जुलै 2020 रोजी, 2012 साली स्थापन केलेल्या समितीकडे गोव्यातील 69 झोन वगळण्यात यावे असा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार सध्याच्या केंद्रीय समितीने 69 इको सेन्सेटिव्ह झोनमधील गावे इको सेन्सेटिव्ह झोनमधून काढण्यासाठी जो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला होता, त्या निर्णयाला पाठिंबा देऊन निर्णय घेण्यात आला असे तवडकर म्हणाले.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप अनुसूचित जमात मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विकास व्हावा या हेतूने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याचे तवडकर यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. आता राज्यातील एकूण 30 गाव इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून कायम राहणार असल्याची माहिती तवडकर यांनी दिली.