प्रतिनिधी / वास्को
गोवा प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी गुरूवारी वास्कोत भाजपा सरकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र डॉ. प्रमोद सावंत, वाहतुकमंत्री माविन गुदिनहो, आमदार एलिना साल्ढाना तसेच आमदार जोशुआ डिसोजा यांच्याविरूध्द वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱयांच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या नेत्यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून पत्रकार परिषद घेतल्या प्रकरणी वास्को पोलिसांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांना मध्यरात्री अटक केली होती. त्यामुळे प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, ऍड. वरद म्हार्दोळकर व इतर कार्यकर्त्यांनी गुरूवारी वास्कोत येऊन त्या कारवाईचा निषेध केला व आपणही मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या इतर नेत्यांनी केलेल्या नियम उल्लंघन प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी केली.
दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सॅपरेटर उड्ढाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी मोठय़ा संख्येने एकत्र जमून मुख्यमंत्र्यांसह, वाहतुकमंत्री तसेच आमदार एलिना साल्ढाना आणि आमदार जोशुआ डिसोजा यांनी जिल्हाधिकाऱयांच्या नियमांचे उल्लंघन केले होते. जिल्हाधिकाऱयांचे कायदे केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच लागू होतात काय असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर मंत्री व नेते नियमांचे उल्लंघन करून अनेक कार्यक्रम घडवून आणतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी यापूर्वीच मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात नियमांच्या उल्लंघन प्रकरणी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केलेली आहे.