स्थानिक व्यापाऱयांत फूट : प्रशासनावर पक्षपाताचा आरोप : उर्वरित स्टॉलधारक धास्तावले
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
ओरोस-सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात मंगळवारी पोलीस बंदोबस्तात पहाटेपासून जिल्हा मुख्यालयात जाणाऱया मुख्य रस्त्यावरील टपऱया हटाव मोहीम हाती घेण्यात आल्याने परिसरातील स्टॉलधारकांमध्ये खळबळ उडाली. ओरोस बाजारपेठेत नुकत्याच उभ्या करण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडसह ओरोस मुख्य फाटा ते सिडको बिल्डिंगपर्यंतच्या रस्त्यालगतच्या सर्व टपऱया जेसीबी लावून तोडण्यात आल्या.
नव्याने उभारण्यात आलेल्या टपऱयांवरच ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा प्रशासनातर्फे करण्यात आला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व्ही. व्ही. जोशी, पोलीस उपनिरीक्षक बी. आर. सवंडकर, कुडाळ तहसीलदारांसह पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
मुख्यालयातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि मुख्यालयातील मुख्य मार्गालगत फुटपाथ उभारणीच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर या फुटपाथ मार्गात अडथळा ठरणाऱया टपऱया कोणत्याही क्षणी काढल्या जातील, याची शक्यता होती. याबाबतच्या नोटिसा प्राधिकरणतर्फे स्टॉलधारकांना देण्यातही आल्या होत्या. मंगळवारी पहाटेपासूनच अचानक जिल्हा प्रशासनाने ही मोहीम हाती घेऊन अलिकडच्या काळात उभारलेले स्टॉल व टपऱया तोडून टाकल्या. याच दरम्यान या टपऱया हटाव पथकाने अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या उपस्थितीत ओरोस बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी गावठी बाजाराच्या नावाने उभारण्यात आलेली नवीन पत्राशेडही तोडून टाकली. या कारवाईने मात्र सदर बाजारपेठेतील व्यापाऱयांच्या एका गटाने त्यास जोरदार आक्षेप घेतला. एकतर्फी कारवाईचा आरोप करीत या व्यापाऱयांनी ही शेड अनधिकृत ठरवून तोडत असाल, तर संपूर्ण बाजारपेठेत अनधिकृत असलेल्या शेड देखील कोणत्याही परिस्थितीत हटवल्या पाहिजेत, अशी मागणी केली. यावर व्यापाऱयांशी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांनी तुम्ही तुमची मागणी लेखी स्वरुपात द्या, असे सांगितले.
अन्य स्टॉलधारक धास्तावले
दरम्यान मुख्यालयात रस्त्याच्या दुतर्फा असलेले जुने अनेक स्टॉल व टपऱया या देखील अनधिकृत असून फुटपाथ बनवण्याचे निमित्त साधत या टपऱया व स्टॉलवर देखील कारवाई तर होणार नाही ना, अशी भीती स्टॉलधारकांना लागून राहिली आहे. हे सर्व स्टॉलधारक स्थानिकच असून या स्टॉलवर त्यांचे पोट चालते.
तर सगळेच अनधिकृत मार्केट तोडा – मालवणकर
ओरोस बाजारपेठेतील तात्पुरत्या स्वरुपाच्या मार्केट उभारणीवरून यापूर्वीच स्थानिक व्यापाऱयांमध्ये दोन गट पडले आहेत. आजच्या या कारवाईत पत्राशेड तोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका गटाने पूर्णपणे अनधिकृत असलेले संपूर्ण मार्केटच तोडा, अशी जोरदार मागणी केली. प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी असून सत्ताधाऱयांचे लांगुलचालन करणाऱया व्यापाऱयांचे अनधिकृत स्टॉल असतानाही त्यांच्या स्टॉलना जाणीवपूर्वक अभय देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. बाजारपेठेत तोडण्यात आलेली शेड ही ओरोस पंचक्रोशीतील स्थानिक शेतकऱयांना आपल्या शेतात पिकणारा माल बाजारपेठेत बसून विकता यावा, यासाठी उभारण्यात आली होती, असा दावाही केला. प्रशासनाच्या या कारवाईचा आम्ही निषेध करीत असून या कारवाईवरून परिस्थिती चिघळली, तर त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या व्यापारी गटातील नेतृत्व करणारे पांडू मालवणकर यांनी दिला.