कोकण विकासाचा आढावा घेणार तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे मुक्काम
प्रतिनिधी / मालवण:
मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱयावर येत आहेत. 17 व 18 फेब्रुवारी या दोन दिवशीय दौऱयात आंगणेवाडी यात्रोत्सवात भराडी मातेचे दर्शन, किल्ले सिंधुदुर्ग भेट, चिपी विमानतळ पाहणी याबरोबरच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्हय़ांच्या विकासाची आढावा बैठक घेतली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम तारकर्लीत असणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी दिली.
17 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता आंगणेवाडी यात्रोत्सवात देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता तारकर्ली येथील एमटीडीसी स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे सिंधुदुर्गसह कोकणातील विकासकामांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री कार्यालयातर्फे घेतली जाणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अदिती तटकरेंसह अन्य मंत्री तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील अव्वल सचिव, उच्चस्तरीय अधिकारी व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.
किल्ले सिंधुदुर्ग भेट : चिपी विमानतळ पाहणी
18 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री ठाकरे किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजता तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे रत्नागिरी जिल्हय़ातील विकासकामांबाबत आढावा बैठक, 1 वाजता रायगड जिल्हय़ातील विकासमांबाबत आढावा बैठक, 3 वाजता चिपी विमानतळाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. एकूणच या दोन दिवशीय दौऱयात मुख्यमंत्र्यांसोबत आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती असणार आहे.
प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मंगळवारी सकाळी तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर, किल्ले सिंधुदुर्ग तसेच अन्य दौरा मार्गावर भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला.