प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यातील विविध भागात वादळामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचे काम अग्नीशामक दल तसेच वीज खात्याचे कर्मचारी युध्दपाळीवर करीत आहेत. विविध भागात अद्याप गंभीर समस्या असून वीज पुरवठाही अद्याप सुरळीत झालेला नाही. अनेक घरादारांवरील वीज वाहिन्या अद्याप हटवण्याचे बाकी आहे.
मुरगाव तालुक्यातील विविध भागांना वादळाची जबरदस्त झळ बसलेली आहे. मोठय़ा नुकसानीच्या घटना घडलेल्या नसल्या तरी घरांची किरकोळ हानी तसेच वाहनांचीही हानी वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या आहेत. या वादळी वाऱयामुळे वीज खात्याचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. वीज पुरवठा नसल्यामुळे वास्को व मुरगाव, दाबोळी, सांकवाळ व इतर भागातील पाणी पुरवठय़ावरही परीणाम झाला. रस्त्यां रस्यांवरील व घरांवरील अडथळे दूर करण्याचे काम मंगळवारी तिसऱया दिवशीही चालूच होते. मुरगाव तालुक्यातील वातावरण सुरळीत होण्यासाठी अद्याप चार दिवस लागण्याची शक्यता अग्नीशामक दलाच्या सुत्रांनी व्यक्त केली. आज बुधवारी संध्याकाळपर्यंत बऱयाच भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. अग्नीशामक दलाचे कर्मचारी तसेच वीज खात्याचे कर्मचारी या समस्या सोडवण्यासाठी युध्द पातळीवर काम करीत आहेत.
वादळाचा सर्वाधीक फटका वीज पुरवठय़ाला बसला आहे. सोमवारी दिवसभरात वास्कोतील काही भागांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज खात्याला यश आले होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा हे प्रयत्न युध्द पातळीवर सुरू होते. वास्को शहरात अवघ्याच काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला होता. मांगोरहिल, बायणा, सांकवाळ, कासावली, दाबोळी, नवेवाडे अशा विविध भागात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. वास्को शहर सध्या गंभीर वीज समस्येत आहे. मात्र, लॉकडाऊनचा काळ असल्याने व्यवसायीकांना फारशी झळ बसलेली नाही. बँका व कार्यालयात सध्या त्रास सहन करावा लागत आहे.
नौदलाने चौघा मच्छीमारांना वाचवले
वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या चौघा मच्छीमारांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आले. भारतीय नौदलाने सोमवारी पहाटे मंगळूर विमानतळावरून या बचावासाठी उड्डाण केले होते. चौघा मच्छीमारांसह एक टग मंगळूरनजीकच्या खोल समुद्रात बुडण्याच्या अवस्थेत आला होता. त्यामुळे मच्छीमार जीव वाचवण्यासाठी मदतीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे नौदलाने बचावासाठी अत्याधुनिक हलक्या हेलिकॉप्टरचा वापर करून हे बचाव कार्य पार पडले. त्या टगवरून चौघाही मच्छीमारांना सुरक्षीतरीत्या हेलिकॉप्टरमध्ये उचलले.
मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून वादळातील नुकसानीची पाहणी
दाबोळी मतदारसंघात वादळाची झळ बसलेल्या विविध भागांना पंचायत व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दाबोळीतही विविध भागात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचे काम जोरात आहे.
दाबोळी मतदारसंघातील वाडे, नवेवाडे, चिखली इत्यादी ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात काही घरे, कुंपणे, वाहने यांचे नुकसान झालेले आहे. अशा घटनांमध्ये वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज पुरवठाही ठप्प आहे. हा पुरवठा सुरळीत करण्याचे काम काल मंगळवारी सुरूच होते. रस्त्यांवर आलेले मातीचे ठिकाणी व इतर अडचणीही दूर करण्यात येत आहेत.
मंत्री माविन गुदिन्हो यांनी अशा घटनांच्या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, समाजसेवक कायतान झेवियर कार्यकर्ते व इतर जण हजर होते.