नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचा दावा, विजयाचा विश्वास व्यक्त
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपा समर्थक उमेदवार जाहीर केले. पंचवीसपैकी चोवीस प्रभागात अधिकृत उमेदवार जाहीर करताना एका प्रभागात मित्रत्वाची लढत होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुरगाव पालिकेसाठी ठेवण्यात आलेले सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यासंबंधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा तसेच खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते. वास्को मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, मुरगाव मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर तसेच दाबोळी मंडळाचे अध्यक्ष संदीप सूद व भाजपा समर्थक उमेदवार यावेळी उपस्थित होते.
वास्को, दाबोळी व मुरगावच्या भाजपाच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसून पालिका निवडणुकीत ते पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यरत राहतील असे स्पष्ट करून पक्षाध्यक्ष तेंडुलकर यांनी अन्य पालिकांवर जसा भाजपाने विजय मिळवला त्याचप्रमाणे मुरगावसह इतर पालिकांवरही भाजपा येत्या पालिका निवडणुकीत विजय प्राप्त करेल, असा विश्वास व्यक्त केला. मंत्री माविन गुदिन्हो यांनी कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक होत असल्याने प्रत्येक नागरिकाने या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व आवश्यक नियमांचे पालन करून धोका दूर करावा, असे आवाहन नागरिकांना केले.
प्रदेश अध्यक्ष तानावडे यांनी मुरगावच्या पंचवीसपैकी चोवीस प्रभागातील उमेदवार जाहीर करताना प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपाचेच दोन उमेदवार लढत असल्याने तिथे मित्रत्वाची लढत होणार असल्याचे सांगितले. इतर अधिकृत उमेदवार त्यांनी खालीलप्रमाणे जाहीर केले.
मंजूषा पिळणकर (प्रभाग क. 1), दयानंद नाईक (प्रभाग क्र. 2), कुणाली मांद्रेकर उर्फ पार्सेकर (प्रभाग क्र. 3), दामोदर कासकर (प्रभाग क्र. 4), दामोदर नाईक (प्रभाग क्र. 5), प्रजय मयेकर (प्रभाग क्र. 6), रामचंद्र कामत (प्रभाग क्र. 7), मुरारी बांदेकर (प्रभाग क्र. 8), तनुजा सावंत (प्रभाग क्र. 9), नारायण बोरकर (प्रभाग क्र. 11), दीपक नाईक (प्रभाग क्र. 12), शलाका कांबळी (प्रभाग क्र. 13), मातीयास मोंतेरो (प्रभाग क्र. 14), प्रिया राऊत (प्रभाग क्र. 15), सुदीप धारगळकर (प्रभाग क्र. 16), फेड्रीक हेन्रीक्स (प्रभाग क्र. 17), अमेय चोपडेकर (प्रभाग क्र. 18), देविता आरोलकर (प्रभाग क्र. 19), यतीन कामुर्लेकर (प्रभाग क्र. 20), श्रद्धा महाले (प्रभाग क्र. 21), सुदेश भोसले (प्रभाग क्र. 22), विनोद किनळेकर (प्रभाग क्र. 23), कॅटरिना झेवियर (प्रभाग क्र. 24), ग्रासिएस कुतिन्हो (प्रभाग क्र. 25).
मुरगावसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल, एकूण संख्या वीस
दरम्यान, मुरगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱया दिवशी शनिवारी एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात प्रभाग क्र. 1 – प्रणिता खोर्जुवेकर, प्रभाग क्र. 4 – जयेश शेटगांवकर, प्रभाग क्र. 11 – सोनम तारी, प्रभाग क्र. 12 – सुरेंद्र चोडणकर, अशोक चोडणकर, नाना घोगळे, प्रभाग क्र. 17 – परशुराम मदार, आदीत्य यादव, प्रभाग क्र. 20 कृतिका बोरकर, प्रभाग क्र. 21 – तारा केरकर यांचा समावेश आहे. मुरगावसाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या वीस झाली.